ETV Bharat / state

'अधिकार्‍यांनी शेती कसून वीजबिले वसूल करावीत'; परभणीत स्वाभिमानीचा वीज मंडळाला इशारा

author img

By

Published : Mar 19, 2021, 6:42 PM IST

swabhimani-shetkri-shanghatna-canceled-their-protest-sue-to-corona-in-parbhani
कोरोनामुळे परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन रद्द...

लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे भरमसाठ नुकसान झाले असून, त्यांच्या शेतीची तसेच पंपाची जोडणी थकीत बिलापोटी तोडले जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विज बिल मुक्त करा, अशी मागणी करत आज (शुक्रवारी) दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील वीज मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

परभणी - जिल्ह्यात सध्या वीजेची थकबाकी असणाऱ्या शेतांची जोडणी तोडण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. मात्र, हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (शुक्रवारी) 'रास्तारोको'चा इशारा दिला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन रद्द करून कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत, 'यापुढे शेतांच्या वीजजोडण्या तोडल्यास शेतकऱ्यांची जनावरे कार्यालयात आणून बांधू, त्यानंतर अधिकाऱ्यांनीच शेती करून आपली वीज बिले वसूल करावीत, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. तर दुसरीकडे 'शासनाच्या ध्येय धोरणानुसार कारवाई केली जाईल', अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता के.एम. जमदाडे यांनी दिली. ज्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी आणि वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांमधील हा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

कोरोनामुळे परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन रद्द...


शेती कसून आपली बिले वसूल करा - जिल्हाध्यक्ष ढगे

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात अनेक लोकांचे रोजगार बुडालेले असताना त्यांना हजारो रुपयांची वीज बिले देण्यात आली. यात शेतकऱ्यांचे भरमसाठ नुकसान झाले असून, त्यांच्या शेतीची तसेच पंपाची जोडणी थकीत बिलापोटी तोडले जात आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विज बिल मुक्त करा, अशी मागणी करत आज (शुक्रवारी) दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील वीज मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी 'यापुढे वीज मंडळाने वीज जोडणी तोडल्यास शेतकऱ्यांचे जनावरे वीज मंडळाच्या कार्यालयात आणून बांधू आणि त्यानंतर वीज मंडळाच्या अधिकार्‍यांनी शेती कसून आपली बिले वसूल करावी', असा इशारा दिला आहे.

शासनाच्या धोरणानुसार कारवाई होणार - कार्यकारी अभियंता

तर दुसरीकडे वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता के. एम. जमदाडे यांनी सांगितले की, थकीत वीज बिले बाकी ठेवणाऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. या प्रकरणी देखील शासनाने दिलेल्या ध्येय धोरणानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. ज्यामुळे थकीत वीज बिल धारकांची वीज जोडणी खंडीत होणार असल्याचा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आणि वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा संघर्ष येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रास्तारोको रद्द -

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी केलेल्या विनंतीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या विरोधात आज (शुक्रवारी) दुपारी गंगाखेड रोडवरील तरोडा पाटीवर नियोजित केलेला रास्तारोको रद्द करण्यात आला. त्यानंतर वीज मंडळाला निवेदन देऊन त्यात मागण्या मान्य न झाल्यास वरीलप्रमाणे पुढील काळात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. सदर निवेदन देण्यासाठी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा -वाशिम जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.