ETV Bharat / state

ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी - भाजप आमदार मेघना बोर्डीकर

author img

By

Published : Oct 24, 2021, 8:47 PM IST

farmers diwali will be black mla Meghna Bordikar
शेतकरी नुकसान भरपाई मागणी मेघना बोर्डीकर

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अध्यापही नुकसान भरपाई दिलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विमा कंपनीच्या अनिल अंबानी यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून ही काळी दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली.

परभणी - ठाकरे सरकारने केवळ मदतीची घोषणा केली, मात्र अध्यापही अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विमा कंपनीच्या अनिल अंबानी यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून ही काळी दिवाळी साजरी करणार असल्याचे आमदार मेघना बोर्डीकर व भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी परभणीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

माहिती देताना आमदार मेघना बोर्डीकर

हेही वाचा - सरकार जाणार म्हणून शाहरुख खानची वकिली स्वीकारली; चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना टोला

परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी 10 हजार रुपये नुकसान भरपाईची मदत जाहीर केली आहे. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाली नाही. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज रविवारी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी भाजप आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, संजय शेळके, भाई कुलकर्णी, ॲड. तांदळे, संजय रिझवानी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

फसव्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची थट्टा -

दरम्यान, राज्यातील 55 लाख हेक्‍टरहून अधिक शेतजमिनीवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. मात्र, प्रत्यक्षात 100 लाख हेक्‍टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. पुरामुळे शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. जमिनीचा कस संपल्यामुळे पुढील 10 वर्षे कुठलीही पीक येण्याची शाश्वती राहिलेली नाही. असे असताना ठाकरे सरकारने केवळ 10 हजार रुपयांच्या फसव्या मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप मेघना बोर्डीकर यांनी यावेळी केला.

नवाब मालिकांना पालकमंत्री असल्याचा विसर -

परभणी जिल्ह्यातील तब्बल 4 लाख शेतकऱ्यांचा पिक विमा थकला आहे. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. मराठवाड्यात एवढी अतिवृष्टी झाली, मात्र मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. तर, पालकमंत्री नवाब मलिक यांनी सुरुवातीला सजवलेल्या बैलगाडीतून पाहणी केली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. कदाचित त्यांना परभणीचे पालकमंत्री असल्याचा विसर पडला आहे. कारण ते सध्या आर्यन खानची वकिली करत असल्याचा टोला आमदार बोर्डीकरांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांची परभणीतील 'ती' क्लीप ऐकवली -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपूर्वी परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत शिवारांची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव आणि निळा परिसरात बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या याच आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधलेली व्हिडिओ क्लिप पत्रकारांना ऐकवली.

अनिल अंबानी, उद्धव ठाकरेंचे पुतळे जाळू -

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारच्या काळात हेक्टरी 20 हजार 400 रुपये मदत मिळाली होती. मात्र, ठाकरे सरकारने केवळ 10 हजारांची मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळाल्यास त्याचा फायदा होणार आहे. परंतु, ठाकरे सरकार केवळ घोषणांची आतषबाजी करत आहे. त्यामुळे, सरकारला जाब विचारण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रिलायन्स विमा कंपनीच्या अनिल अंबानी यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळून काळी दिवाळी साजरी करणार असल्याचे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम म्हणाले.

हेही वाचा - आता तुमच्याच शब्दात सांगतोय, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजाराची मदत द्या - रावसाहेब दानवे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.