सोनपेठ बलात्कार प्रकरण : आरोपींना फाशी द्या; 'महिला सुरक्षे'वर विशेष अधिवेशन बोलवा - भाजप महिला प्रदेशाध्यक्षा

author img

By

Published : Sep 21, 2021, 7:30 PM IST

Updated : Sep 21, 2021, 7:46 PM IST

Sonpeth rape case

मुंबईतील साकीनाका घटनेपाठोपाठ परभणी (सोनपेठ) येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू झाल्याने आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे.

परभणी - मुंबईतील साकीनाका घटनेपाठोपाठ परभणी (सोनपेठ) येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू झाल्याने आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे. तसेच याविषयी चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, अशीही मागणीही खापरे यांनी आज (मंगळवारी) परभणी येथे पत्रकार परिषदेत केली.

सोनपेठ घटनेतील आरोपींना फाशी झाली पाहिजे -

सोनपेठ येथील शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचारानंतर त्या पीडित मुलीने विष प्राशन केले होते, यात सहा दिवसांनंतर काल सोमवारी संध्याकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज मंगळवारी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी त्या पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची देखील भेट घेऊन त्यांनी 'या प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला असून, आता आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे', अशी मागणी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण भाजपा महिला जिल्हाध्यक्षा डॉ.विद्या चौधरी व सुप्रिया कुलकर्णी उपस्थित होत्या.

पत्रकार परिषदेत बोलताना भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे
मुख्यमंत्र्यांच्या पत्राची केली होळी -
दरम्यान, राज्यातील महिलांवरील होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ झाल्याचे सांगत याप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा, असे निर्देश राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. मात्र, यासंदर्भात केंद्राकडे बोट दाखवणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिल्याचा आरोप करत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्र्यांच्या त्या पत्राची होळी केली. तसेच महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.


हे ही वाचा - अनिल परबांचा किरीट सोमैयांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस -

'राज्यातील महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. महिलांचा सन्मान राखण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत आहे. महिलांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळत आहे. तर इकडे राज्यात मात्र, ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे महिलांवर अत्याचारांचा कळस गाठला आहे. मुंबईतील साकीनाका येथे तसेच पुण्यात वानवडी येथे १४ वर्षांची अल्पवयीन बालिका आणि २५ वर्षीय गतिमंद तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांनी आणि आता परभणी (सोनपेठ) येथील घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि गुन्हेगारांना संरक्षण देण्याच्या धोरणामुळे राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांना ऊत आला आहे, असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा -लेटरवॉर.. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले राज्यपालांची 'ही' कृती संसदीय लोकशाहीला मारक


शक्ती कायदा आघाडी सरकारमुळे अंमलात नाही -

राज्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याने महिलांवर अत्याचार करणारे मोकाट फिरत आहेत. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षेची तरतूद असणारा शक्ती कायदा आघाडी सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे अंमलात येऊ शकलेला नाही. राज्यातील आघाडी सरकार महिलांच्या सुरक्षेविषयी कमालीचे असंवेदनशील असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. सरकारमधील तीन पक्ष एकेमकांना सांभाळत बसल्यामुळे पोलिसांना काम करणे कठिण झाले आहे. त्यामुळेच या विषयावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे, अशी महिला मोर्चाची मागणी आहे.

मुंबईत 7 महिन्यात बलात्काराचे 550 गुन्हे -

यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईत बलात्काराचे 550 गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत या वर्षी सात महिन्यांमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये 323 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले, तर 227 प्रौढ महिलांवर बलात्कार झाले. पोक्सो कायद्यांतर्गत विनयभंगाचे 7 महिन्यांत 243 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर विनयभंगाच्या सुमारे 1,100 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै 2020 या महिन्यादरम्यान मुंबईत बलात्काराच्या 377 घटना घडल्या होत्या. 2021 साली गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून मुंबईत बलात्काराचे 550 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 2020 मध्ये मुंबईत बलात्काराच्या 767 घटना घडल्या, तर विनयभंगाचे 1945 गुन्हे दाखल झाले होते, असेही उमा खापरे यांनी सांगितले.

Last Updated :Sep 21, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.