ETV Bharat / state

ऊसतोड टोळी पळाली म्हणून आदिवासी मजुरांना मुकादमानं ठेवंल डांबून; साताऱ्यात रंगला सुटकेचा थरार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 11:02 AM IST

Updated : Jan 9, 2024, 1:22 PM IST

Tribal Sugarcane Workers
आदिवासी मजुरांना मुकादमानं ठेवंल डांबून

Tribal Sugarcane Workers : पालघर जिल्ह्यातील आदिवासी मजूर सातारा जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेले होते. मात्र यातील काही मजूर मुकादमाच्या जाचाला कंटाळून पळून गेले. त्यामुळं मुकादमानं इतर मजुरांना डांबून मारहाण केल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर Tribal Sugarcane Workers : ऊसतोड करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी मजूर सातारा जिल्ह्यांतील कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी गेले होते. या टोळीतील काही मजूर मध्येच पळून गेल्यानं राहिलेल्या मजुरांना डांबून ठेवून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढं आली आहे. त्यांना वेठबिगारासारखी वागणूक मिळाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं राज्यभरात खळबळ उडाली. दरम्यान, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या मदतीनं 25 ऊसतोड मजुरांची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या मजुरांमध्ये 13 मुलांचा समावेश आहे.

ऊसतोड टोळी पळाली म्हणून आदिवासी मजुरांना मुकादमानं ठेवंल डांबून

मजुराला मुकादमाकडून मारहाण : कोरेगाव तालुक्यातील कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी जव्हार इथले आदिवासी ऊसतोड मजुरांना मुकादमानं नेलं होतं. त्यासाठी या मजुरांना आगाऊ रक्कम देण्यात आली होती. गेल्या चार महिन्यांपासून मजुरांची टोळी तिथं ऊसतोडणी करते, परंतु त्यातील काही लोक ऊसतोडणीचे काम अर्धवट सोडून आगाऊ रक्कम न देता पळून गेले. त्यामुळं मुकादमानं राहिलेल्या आदिवासी मजुरांना छळायला सुरुवात केली आहे. गेल्या 15 दिवसापासून त्यांना मारहाण केली जात असल्याचा आरोप या मजुरांनी केला आहे. यातील एका मजुराला जबर मारहाण झाली असून, तो जखमी आहे. या टोळीतील 25 लोकांना सध्या वेठबिगाराची वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दररोज 14-15 तास काम करूनही आठवड्यातून एकदा एक हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.

मजुरांवर अत्याचाराच्या घटनेला अशी फुटली वाचा : पालघर जिल्ह्यातील मजुरांना डांबून त्यांच्याकडून काम करून घेतलं जात असल्याचा व्हिडिओ एका मजुरानं बनवला होता. 14 पैकी 4 कुटुंब पळून गेल्यानं या मजुराला मारहाण केल्याचंही त्यानं व्हिडिओमध्ये सांगितलं. या व्हिडिओची तत्काळ दखल घेत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी श्रमजीवी संघटनेचे एक पथक सातारा इथं पाठवत या 12 मजुरांची आणि 13 बालकांची सुटका केली आहे. याबाबत सबंधित मालकावर साताऱ्यातील कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजुरांनी केलं मदतीचं आवाहन : कोरेगाव येथील ठेकेदार तेजेश यादव आणि नामदेव खरात यांच्याकडं पालघर इथले ऊसतोड मजूर ऊसतोडीच्या कामावर गेले होते. यातील चार कुटुंबं मालकाच्या जाचाला कंटाळून निघून आली. यानंतर संतप्त होऊन मालकानं इतरांना मारहाण केली. मागच्या सहा दिवस त्यांना डांबून ठेवून त्यांच्या छळ केला. कोणताही मार्ग सापडत नसल्यानं एका मजुरानं कामावर आल्यानंतर मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बनवत आपल्यावरील अत्याचाराची व्यथा मांडली आणि मदतीचं आवाहन केलं होतं.

कार्यकर्त्यांनी केला मजुरांची सुटका : जव्हार येथून पालघर महिला जिल्हा उपप्रमुख सीता घाटाल, जिल्हा युवक सचिव तथा पंचायत समिती सदस्य अजित गायकवाड, संतोष धिंडा, अंकुश वड, रवींद्र वाघ, ईश्वर बांबरे हे कार्यकर्ते या पथकात होते. या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्षात घटनास्थळी त्या मजुरांची भेट घेतली. त्यांची सर्व परिस्थिती जाणून घेऊन कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बिराजदार आणि तहसीलदार कोडे यांना बरोबर घेऊन मजुरांना मुक्त केलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या मजुरांचा जबाब घेतला असून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी वाहनं पाठवली.

हेही वाचा :

  1. ऊसतोडणीमुळे बिबट्याचे जंगल होणार जमीनदोस्त; वनविभागाकडून जनजागृती
  2. ऊसतोड सुरू असतानाच काठापूर बुद्रुकमध्ये आढळला भुकेने व्याकुळ झालेला बछडा
  3. Woman Giving Birth On Road : ऊसतोड महिलेची रस्त्यातच प्रसूती; खुरप्याने कापावी लागली नाळ
Last Updated :Jan 9, 2024, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.