ETV Bharat / state

Ganesha Idols : 26 वर्षात 39 हजार सूक्ष्म गणेश मूर्ती साकारणारा अवलिया, अमिताभ बच्चननेही केलंय कौतुक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 3:41 PM IST

Ganesha Idols : गणपतीवर असलेल्या अपार श्रद्धेमुळं सिन्नर येथील संजय क्षत्रिय या कलाकारानं आपल्या पत्नीसह मुलीच्या मदतीनं विविध स्वरूपातील 39 हजार लघु गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. गेल्या 26 वर्षांपासून ते या मूर्ती तयार करीत आहेत.

Ganesha Idols
Ganesha Idols

संजय क्षत्रिय यांची प्रतिक्रिया

नाशिक Ganesha Idols : जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मूर्तीकार संजय क्षत्रिय यांनी गेल्या 26 वर्षात तब्बल 39 हजार सूक्ष्म गणेश मूर्ती साकारल्या आहेत. त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नीसह मुलीनं मदत केलीय. या वर्षी त्यांनी त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, बद्रीनाथ या मंदिराप्रमाणे बारा ज्योतिर्लिंग, विविध प्रसिद्ध मंदिराच्या एक इंच ते सहा इंच आकाराच्या प्रतिकृती साकारल्या आहेत.


39 हजार लघु गणेशमूर्ती तयार : सिन्नर तालुक्यातील रंगकाम करणारे संजय क्षत्रिय यांना गणेशमूर्ती पाहिल्यानंतर लघु मूर्ती तयार करण्याची प्रेरणा मिळाली. व्हाईटनिंग पावडर तसंच गम वापरून त्यांनी विविध स्वरूपातील तीन इंचाच्या एक हजार गणेशमूर्ती तयार केल्या. हा केलेला त्यांनी पहिलाच प्रयोग होता. याच प्रेरणेतून क्षत्रिय यांना लघु गणेशमूर्ती तयार करण्याचा छंद लागला. जेमतेम उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असताना त्यांनी गणेशावरची श्रद्धा कायम ठेवली. संजय क्षत्रिय यांनी 26 वर्षात शाडू माती तसंच डिंकाचा वापर करून 39 हजार लघु गणेशमूर्ती तयार करण्याचा विक्रम केला आहे. हा प्रवास असाच सुरू राहणार असल्याचं या क्षत्रिय यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटलंय.

विविध सूक्ष्म मूर्ती साकारल्या : सूक्ष्म गणेश मूर्ती बरोबरच मूर्तीकार क्षत्रिय यांनी एक लाख आगपेटीच्या काड्यांचा वापर करून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती, 200 खडूंचे 500 तुकडे करून त्याद्वारे साकारलेले आयोध्यातील प्रास्तावित श्रीराम मंदिर, 11 किलो कापसापासून दिल्लीतील अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती तयार केलीय. पुढे त्यांनी 25 किलो साबुदाणा तसंच फेविकॉलचा वापर करून ताजमहल प्रतिकृती, 11 हजार सूक्ष्म गणेश मूर्ती पासून महागणेश, 82 गणेश मूर्ती पासून दहीहंडी, सुपारीवर 11 सूक्ष्म गणेश मूर्ती साकारण्याचं काम केलंय. गाण्याच्या ऑडिओ कॅसेटवर सुईचा वापर करून 1 हजार 100 गणेश मूर्ती त्यांनी तयार केल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक : यावर्षी क्षत्रिय यांनी तीन महिन्यांपासून मेहनत करत 12 ज्योतिर्लिंगांसह 51 मंदिरे तयार केली आहेत. यावर त्यांनी पूर्णपणे भिंगाचा वापर करून सूक्ष्म काम केलंय. यंदा त्यांनी आपल्या घरात एक सेंटीमीटर उंचीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीचीही प्रतिष्ठापना केलीय. त्यांच्या या कलेचं महानायक अमिताभ बच्चन यांनीही पत्र पाठवून कौतुक केलंय.

हेही वाचा -

  1. MLA Disqualification Case : ठरलं! 'या' तारखेपासून आमदार अपात्रतेसंदर्भात होणार सुनावणी; राहुल नार्वेकरांची माहिती
  2. Aaditya Thackeray on Democracy : देशात आणि राज्यात लोकशाही उरली नाही; आदित्य ठाकरेंचा घणाघात
  3. BJP Leader Controversial Statement : 'वाचाळवीरांमुळं भाजपा अडचणीत'
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.