ETV Bharat / state

'केशरी रेशन कार्डधारकांना राज्य  सरकारकडून तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ'

author img

By

Published : Apr 25, 2020, 8:13 PM IST

भुजबळ
भुजबळ

केशरी रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य सरकारकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य रेशन दुकानांमधून देण्यात येत आहे. राज्यातील तीन कोटी आठ लाख एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून १ मे ऐवजी आता २४ एप्रिलपासूनच १.५६ लाख मे. टन धान्याचे वितरण सुरू झाले आहे.

नाशिक - राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य सरकारकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य रेशन दुकानांमधून देण्यात येत आहे. राज्यातील तीन कोटी आठ लाख एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून १ मे ऐवजी आता २४ एप्रिलपासूनच १.५६ लाख मे. टन धान्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

छगन भुजबळ

शिधावाटप दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी (एपीएल) कार्डधारक नागरिकांना अन्नधान्य देण्यात येत नव्हते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहून लॉकडाऊनच्या परिस्थितीत राज्यातील नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी ५९ हजार ते १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधा पत्रिकाधारकांना १२ रुपये प्रति किलोने दोन किलो तांदूळ व ८ रुपये किलोने तीन किलो गहू प्रति व्यक्ति देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याचे वाटप यापूर्वी १ मे रोजी सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, आता अनेक ठिकाणी २४ एप्रिल पासून हे धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे.

केशरी कार्ड धारकांना यात ९२ हजार मेट्रिक टन गहू व ६२ हजार मेट्रिक टन तांदूळ एका महिन्यासाठी पुरवठ्याचे काम सुरू केले आहे. मुंबई व कोकण, नागपूर विभागात २४ एप्रिलपासून तर औरंगाबाद विभागातील लातूर, नांदेड २४ एप्रिल, जालना २५ एप्रिल, वाशिम, औरंगाबाद, उस्मानाबाद २६ एप्रिल, परभणी येथे २७ एप्रिल तर बीड १ मे, अमरावती विभागात २४ एप्रिल, नाशिकमध्ये १ मे, धुळे २६ एप्रिल, नंदुरबार २५ एप्रिल, जळगाव शहरामध्ये १ मे व २६ एप्रिलपासून ग्रामीण भागामध्ये, अहमदनगर शहरात १ मे व ग्रामीण मध्ये २५ एप्रिल, पुणे ग्रामीणमध्ये २६ एप्रिल, सोलापूर १ मे, कोल्हापूर २४ एप्रिल, सांगली येथे १९ एप्रिल, सातारा येथे १ मे अशारितीने मे महिन्यातील धान्य वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. कालांतरानंतर रेशन दुकानांपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्याच्या व्यवस्थेलाही अनेक ठिकाणी अडथळे आले. धान्य पुरवठा करणारे वाहने आडविणे, रेशन दुकांमध्ये कामगार नाहीत, तर कुठं माथाडी बांधव कामावर यायला तयार नव्हते, अशा परिस्थितीत काम सुरू ठेवणे ही बाब खूप आव्हानात्मक होती. परंतु, वरील सर्व अडचणी लक्षात घेऊन टाळेबंदीच्या काळात राज्यातील ५२ हजार ४२४ दुकानांच्या माध्यमातून साडेसात कोटी लोकांना ७ लाख मेट्रिक टन धान्य अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे दिली.

मंत्री भुजबळ म्हणाले, सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मनात अन्नधान्य पुरवठा सुरळीत होईल किंवा कसे याबाबत भीती होती. परंतु, एक महिना कालावधीत पुरविण्यात येणारे ३.५ लाख मेट्रिक टन अन्नधान्य महिन्याच्या सुरुवातीच्या १० ते १२ दिवसातच वितरीत केले गेले. यानंतर याच साडेसात कोटी लोकांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याचा आदेश केंद्र सरकारमार्फत काढण्यात आला. त्यानुसार २४ एप्रिलपर्यंत सुमारे ९५ टक्के लोकांपर्यंत मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. भारत सरकारकडून डाळ उपलब्ध झाली असून अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्रत्येकाला एक किलो चना किंवा तूर डाळ देण्यात येईल उपलब्ध यंत्रणेच्या साहाय्याने एका महिन्यात एकूण नऊ लाख टन धान्यापैकी साधारण सात लाख टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त कार्यक्षमतेने पुरवठा यंत्रणा कार्यरत असून काही प्रमाणात अडचणी निर्माण होत असल्याने मुंबई कार्यालयात १४ हजार प्राप्त तक्रारींपैकी ८ हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक येथील कार्यालयात २१ हजार तक्रारी व मार्गदर्शनपर विनंती दूरध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त झाले असून त्यांचे निराकरण देखील करण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.