ETV Bharat / state

Farmer Suicide Nashik: चाळीतील कांदा सडल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; कांदा लिलावबंदी उठली जिवावर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 4:07 PM IST

Farmer Suicide Nashik
शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer Suicide Nashik: कांदा व्यापाऱ्यांनी कांदा लिलावावर बहिष्कार टाकल्यानं खरेदी-विक्री व्यवहार गेल्या चार दिवसांपासून ठप्प पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी (Onion producing farmers) साठवून ठेवलेला कांदा सडत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान (suicide due to onion rot) होत आहे. या नुकसानीमुळे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकऱ्यांने काल (शनिवारी) आत्महत्या केली. प्रताप बापू जाधव (वय 36) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

नाशिक Farmer Suicide Nashik: चांगल्या भाव मिळेल या अपेक्षेनं कांद्याचे उत्पादन घेऊनही अपेक्षित भाव न मिळाल्यानं उत्पादन खर्चही भरून निघू शकला नाही. यामुळे मानसिक तणावात येऊन देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. अवघे दीड एकर क्षेत्र असूनही बँकही कर्ज देत नसल्यानं हताश होऊन त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

कर्ज फेडण्याची चिंता वाढली: नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथे राहणारे प्रताप बापू जाधव (वय 36) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव हे पत्नी आणि दोन मुलांसह आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. सातत्याने नापिकीशी सामना करणाऱ्या जाधव यांनी चार पैसे जमवून कांद्याचे उत्पादन घेतले. भाव मिळेल या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला. मात्र तो पूर्णतः खराब झाला. कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करावी आणि दैनंदिन खर्च कसा भागवावा या विवंचनेत असताना त्यांनी घरातील मंडळी झोपलेले असताना आत्महत्या केली. कुटुंबांनी त्यांचा शोधाशोध केली असता त्यांचे स्वेटर विहिरीजवळ आढळून आले.


130 कोटींची उलाढाल ठप्प: निर्यातशुल्क तातडीनं रद्द करावे, बाजार समितीतील मार्केट फी अर्धी करावी आदी मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी जिल्ह्याभरात कांदा लिलावावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसात एकट्या लासलगावी 20 ते 30 कोटी तर जिल्ह्यात सुमारे 120 ते 130 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. जोपर्यंत सर्व मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत कांदा लिलाव होणार नाही, असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे आता राज्य सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागणार आहे. 26 सप्टेंबरला पणन मंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


चाळीत कांदा खराब होतोय: शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा निम्म्याहून अधिक खराब झाला आहे. जो कांदा शिल्लक आहे त्याला विकण्याची सध्या गरज आहे. अन्यथा तो देखील खराब होऊ शकतो, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कांद्यांचे लिलाव कधी सुरू होतील याची शेतकरी वाट पाहत आहेत.


106 व्यापाऱ्यांनी सुपूर्द केले परवाने: चांदवड बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्याबाबत व्यापारी व संचालक मंडळ बैठकीत तोडगा निघाला नाही. नाफेडच्या खरेदीमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. तोट्यात व्यवसाय करण्यापेक्षा तो न केलेला बरा अशी भूमिका घेत कांदा खरेदीवरील बहिष्कार कायम ठेवत 106 व्यापाऱ्यांनी परवाने बाजार समितीकडे सुपूर्द केले.

हेही वाचा:

  1. Farmer Suicide : जालना जिल्ह्यातील पिंपळगाव कोलते येथे पावसाअभावी शेतकऱ्याची आत्महत्या
  2. Agriculture Minister Abdul Sattar : शेतकरी आत्महत्या आजच्या नाहीत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त वक्तव्य
  3. Farmer suicide : शेतकरी आत्महत्येचे या जिल्ह्यात भेसूर वास्तव; 10 महिन्यांत 211 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.