ETV Bharat / state

बिबट्याचा दोन दुचाकीस्वारांवर हल्ला, पिंजरे लावण्याची मागणी

author img

By

Published : Dec 9, 2020, 1:00 PM IST

दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन रात्री शेतात कांदा पिकला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यातच बिबट्याचे माणसांवर हल्ले सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

leopard attack
leopard attack

नाशिक - शेतातून घरी जात असताना रस्त्याच्या काठाला असलेल्या दाट झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. बागलाण तालुक्यातील किकवारी येथील वाघदर शिवारात संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबट्याने त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. बिबट्याचे नख लागल्याने तळवाडे दिगर येथील अभिमन गंगाधर आहिरे (वय ३८) व किकवारी बुद्रुक येथील काकाजी माला वाघ (वय ५०) यांना चालू गाडीवर झाप टाकून पंजा मारला. त्यानंतरही पंधरा ते वीस फुटापर्यंत बिबट्याने त्यांच्या गाडीचा पाठलाग केला.

पिंजरे लावण्याची शेतकऱ्यांची मागणी

अभिमन आहिरे या शेतकऱ्यांस प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, तर काकाजी वाघ शेतकऱ्यास गावातील स्थानिकांनी कळवण ग्रामीण रुगणालयात हलविण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर, किकवारी, मोरकुरे, पठावे दिगर परिसरात बिबट्यांचा उपद्रव वाढत असून दररोज दिवसा सायंकाळी रात्री बिबट्यांचे दर्शन होत असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दररोज प्रत्येक गावातील कोणत्या न कोणत्या शिवारतात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्याच्या घटना घडत असून पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.

जीव मुठीत घेऊन रात्री कांदा पिकाला द्यावे लागते पाणी

परिसरात कांदा लागवडी पूर्ण झाल्या आहेत. तर काही ठिकाणी सुरू आहेत. त्यातच दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन रात्री शेतात कांदा पिकला पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यातच बिबट्याचे माणसांवर हल्ले सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.