ETV Bharat / state

Import Of Tomatoes From Nepal : नेपाळहून अडीच हजार क्विंटल टोमॅटो करणार आयात; पण ग्राहकांना दिलासा नाहीच

author img

By

Published : Aug 7, 2023, 5:01 PM IST

अतिवृष्टीमुळे टोमॅटोचे नुकसान झाले आहे. त्यामुळे टोमॅटोचे किलोचे दर 100 ते 180 पर्यंत जाऊन पोहोचले आहेत. हे दर पुढील महिनाभर असेच राहणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने नेपाळहून टोमॅटो आयातीस परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजार क्विंटल माल येणार असून तूर्त याचा बाजार भावावर काहीही परिणाम होणार नसल्याचे व्यापारांनी सांगितले.

Import Of Tomatoes From Nepal
टोमॅटो आयात करणार

टोमॅटोच्या आयातीविषयी माहिती देताना कृषी उपसंचालक

नाशिक : देशामध्ये हिमाचल, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड केली जाते. मात्र, अतिवृष्टीमुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आवक रोडावली आहे. परिणामी, मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या भावाने उच्चांक गाठला आहे. आजही ग्राहकाला टोमॅटो 100 ते 180 रुपयांनी खरेदी करावे लागत आहे. राज्यात केवळ नाशिक आणि नगरमधील काही भागातून टोमॅटोची आवक होत आहे. नाशिक बाजार समितीमध्ये इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर तालुक्यातून सरासरीच्या तुलनेत केवळ 10 ते 15 टक्के आवक होत आहे. कृषी विभागाकडून राज्यात 45 हजार हेक्टरवर टोमॅटोच्या लागवडीची नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात केवळ सात ते आठ टक्के टोमॅटो लागवड झाली आहे.


केंद्र सरकारने दुजाभाव करू नये : टोमॅटोला कायम दर मिळत नाही. अनेकवेळा आवक वाढल्याने एक दोन रुपये किलो भाव मिळतो. अनेकवेळा वाहतूक खर्च परवडत नसल्याने टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे सध्या दर मिळत आहे. त्यामुळे केंद्राने कोणताही दुजाभाव न करता स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळेल या पद्धतीचा विचार करावा, असे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


मागणीच्या तुलनेत आयात किरकोळ : नेपाळमधील टोमॅटो आकाराने कमी असून तेथून पहिल्या टप्प्यात केवळ दहा ते बारा ट्रक टोमॅटो आयात होईल. मागणीच्या तुलनेत आयात शून्य टक्के राहणार असल्याने भावावर कोणताही परिणाम जाणवणार नाही, असे टोमॅटो व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


11 हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड : नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी तेरा तालुक्यात 11,123 हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. यात नाशिक 520 हेक्टर, इगतपुरी 380 हेक्टर, त्र्यंबकेश्वर 45 हेक्टर, निफाड 2548 हेक्टर, सिन्नर 1888 हेक्टर, येवला 545 हेक्टर, चांदवड 2112 हेक्टर, मालेगाव 94 हेक्टर, सटाणा 155 हेक्टर, नांदगाव 80 हेक्टर, कळवण 589 हेक्टर, दिंडोरी 1682 हेक्टर, देवळा 485 हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे.


मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा : नेपाळहून 2500 टन टोमॅटो आयात करण्यात आला आहे. मात्र, देशात टोमॅटोची मागणी अधिक आहे. त्यामुळे आयात करण्यात आलेल्या 2500 टन टॉमेटोमुळे किंमतीवर फारसा फरक पडणार नाही. सध्या नाशिक जिल्ह्यातील 11 हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. पुढील 20 ते 25 दिवसात हा टॉमेटो बाजारात येईल तेव्हा भाव स्थिर होतील. आज टोमॅटोची आवक कमी असल्याने मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. टोमॅटो उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च होतो. आज ज्यांची टॉमेटो खरेदी करण्याची परिस्थिती आहे त्यांनी तो खरेदी करावा. जेणेकरून आपला पैसा देशात राहील आणि अनेक महिने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा फायदा होईल, असे कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. Tomato Price Hike : टोमॅटो खातोय 'भाव'; दराने शंभरी केली पार
  2. महिनाभरापूर्वी मातीमोल दर असलेल्या टोमॅटोला मिळतोय प्रति किलो 72 रुपये दर!
  3. Today Tomato Rate : एपीएमसी मार्केटमध्ये आज तोंडली, गाजर आणि टोमॅटोचे दर वाढले, वाचा पेट्रोल डिझेल, क्रिप्टोकरन्सी व सोने चांदीचे दर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.