ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस; गंगापूर धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग

author img

By

Published : Sep 12, 2021, 8:59 PM IST

Updated : Sep 12, 2021, 10:04 PM IST

500 cusecs of water being released from nashik gangapur dam
नाशिक जिल्ह्यात 37 मिलिमीटर पाऊस; गंगापूर धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग

नाशिकमध्ये काल (शनिवार) पासून पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात सुमारे 37 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात सतत पाऊस चालू असल्यामुळे धरण समुहातून पाणी सोडण्यात आले आहे.

नाशिक - शहर आणि जिल्ह्यात काल (शनिवार) पासून पावसाने जोर धरला असून जिल्ह्यात सुमारे 37 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात सतत पाऊस चालू असल्यामुळे धरण समुहातून पाणी सोडण्यात आले आहे. गणपती स्थापने बरोबरच जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाल्यामुळे बळीराजा आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान नाशिक तालुक्यातील पिंपळगाव खाब येथे पुल ओलांडण्याचा नादात एक इसम वाहून गेल्याची घटना देखील घडली आहे.

दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात 104.78 मिलिमीटर पाऊस
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शनिवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस हा रविवारी पहाटेपर्यंत सुरू होता. त्यामुळे जिल्ह्यात चांगली परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात 104.78 मिलिमीटर तर शनिवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस हा रविवारी सकाळपर्यंत सुरू असल्याने या कालावधीत सुमारे 37.5 मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. यामध्ये इगतपुरी 422, पेठ 132, सुरगाणा 304, त्र्यंबकेश्वर 282, कळवण 154 ,सिन्नर 152, नाशिक 147, चांदवड 134, नांदगाव 141, येवला 131, मालेगाव 119, बागलाण 153 असा पाऊस नोंदविला गेला आहे.

इसम वाहून गेला

नाशिक तालुक्यातील पिंपळगाव खांब येथे असलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना वसंत गांगुर्डे (वय 45) हा इसम पुल ओलांडण्याचा नादात वाहुन गेल्याचे समोर आले आहे. या इसमाचा शोध नाशिक महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने घेतला जात आहे. या ठिकाणी उपनगर येथील पोलीस देखील दाखल झालेले आहेत.

वाहतूकीवर परिणाम
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांनी बळीराजा सुखावला आहे. मात्र या पावसामुळे इगतपुरीतील कासाराघाट परिसरामध्ये धुके निर्माण झाल्यामुळे या परिसरातील वाहतुकीवर चांगलाच परिणाम झालेला आहे. नाशिक- मुंबई महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

धरणक्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्याने गंगापूर धरण आता 95 टक्के तर दारणा 97 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील 24 धरण क्षेत्रात 75 टक्के पाणी साठा झालेला आहे. तर काही धरण 90 टक्के भरल्याने आता धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. दारणातून 3500 तर नांदूरमध्यमेश्वरमधून 5500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज दुपारी 12 वाजेपासून गंगापूर धरणातून 500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुराच्या नियंत्रणासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

हेही वाचा - ...अन् शेतकऱ्यांनी दीड एकरमधील मिरचीची शेती केली उद्ध्वस्त

हेही वाचा - साकिनाका येथील घटना क्लेशदायक, आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार -भुजबळ

Last Updated :Sep 12, 2021, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.