ETV Bharat / state

'हे स्मशान कधी शांत होईल'? नंदुरबारकरांना पडलाय प्रश्न

author img

By

Published : Apr 18, 2021, 6:52 AM IST

Nandurbar corona patients dead bodies funeral
नंदुरबार कोरोनाबाधित अंत्यसंस्कार बातमी

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. स्मशानामध्ये जळणाऱ्या चितांची अग्नी चोवीस तास धगधगत आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्याचप्रमाणे मृतांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत आहे. दररोज सरासरी दहा ते बारा व्यक्तींचा मृत्यू होत आहे. गेल्या आठ दिवसात 100 पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती नंदुरबार नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात मृत्यूचा दर वाढल्याने 'हे स्मशान कधी शांत होईल' असा भयभीत प्रश्न जिल्हावासियांना पडला आहे.

स्मशानामध्ये जळणाऱ्या चितांची अग्नी चोवीस तास धगधगत आहे

मृतांच्या आकड्यांमध्ये तफावत -

नंदुरबार जिल्हाप्रशासनाकडून येणाऱ्या कोरोना मृत्यूंच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत आढळत आहेत. आतापर्यंत प्रशासनाच्या आकड्यांपेक्षा शंभरपेक्षा जास्त कोरोनाबाधीत मृतदेहांवर एकट्या नंदुरबार नगरपरिषदेकडून अंत्यसंस्कार झाल्याची माहिती समोर येत आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 456 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे तर, नंदुरबार नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत जुन्या स्मशानभूमीत ५५० पेक्षा अधिक कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार पार पाडले आहेत. त्यामुळेच प्रशासन शंभर जणांच्या मृत्यूचे आकडे लपवत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे ५५० हा आकडा फक्त नंदुरबार पालीकेच्या स्मशानभूमीतील आहे. जिल्ह्यातील इतर पालिकाक्षेत्र मिळून हा आकडा तब्बल 626 पेक्षा अधिक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जिल्हातील अनेक बाधितांचा उपचारादरम्यान सुरत अथवा अन्य शहारांमध्ये मृत्यू होत असल्याने त्या आकड्यांचा देखील यात समावेश नाही. त्यामुळे नंदुरबारच्या कोरोना मृत्यू दराबाबत संशय व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसात पालीकेने शंभर कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार केले आहेत. सामान्य रूग्णालयाने फक्त 57 जणांच्या मृत्यूचा अहवाल दिला आहे.

जिल्ह्यातील मृत्यू दरात वाढ -

जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यात वयोवृद्धां सह अनेक तरूणांचा देखील मृत्यू झाला आहे. दररोज वाढत्या मृत्यूंमुळे नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली आहे.

नगरपालिकेतर्फे नि:शुल्क अंत्यविधी -

नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. जिल्हा रूग्णालयात कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींवर नंदुरबार येथील स्मशानभूमीत अंत्यविधी केला जातो. या अंत्यविधीसाठी पालिकेकडून कुठल्याही प्रकारचा खर्च घेतला जात नाही. तसेच अंत्यविधीसाठी आलेल्या मृताच्या नातेवाईकांना पीपीई कीट देखील दिली जात असल्याची माहिती नगरपालिकेतर्फे देण्यात आली.

हेही वाचा - उपराजधानीत घाट अहोरात्र जळतायतं... जागा मिळेल तिथे सरण रचून अंत्यसंस्कार!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.