ETV Bharat / state

हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये विविध संघटनांकडून मूकमोर्चा

author img

By

Published : Oct 2, 2020, 4:11 PM IST

उत्तर प्रदेश राज्यातील हथरस येथे घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून नंदुरबार शहरातील विविध संघटनांकडून मूकमोर्चा काढून दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोर्चेकर्‍यांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदविला.

हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार शहरात विविध संघटनांकडून मुकमोर्चा
हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार शहरात विविध संघटनांकडून मुकमोर्चा

नंदुरबार - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार शहरातील विविध संघटनांकडून मूकमोर्चा काढून दोषींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चादरम्यान सहभागी झालेल्या मोर्चेकर्‍यांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदविला.

हाथरस येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. बलात्काराच्या या घटनेचा विविध संघटनांकडून निषेध नोंदविण्यात आला. नंदुरबार शहरात काल समस्त वाल्मिकी मेहतर समाज, अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत, भिम आर्मी, आरपीआय, रिपब्लिकन पार्टी या संघटनांतर्फे मूकमोर्चा काढण्यात आला.

शहरातील तालुका क्रीडा संकुलात विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन काळ्याफिती लावून मुकमोर्चात सहभाग नोंदविला. हा मूकमोर्चा नेहरु पुतळा, नगरपालिका, शास्त्री मार्केट, हुतात्मा चौक, गणपती मंदिर, सोनारखुंट, टिळक रोड, जळका बाजारमार्गे साक्रीनाका याठिकाणी पोहोचला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी मेणबत्त्या पेटवून अत्याचारग्रस्त युवतीला सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मोर्चाचा समारोप झाला.

आदिवासी महासंघाकडून निषेध

हाथरस येथे युवतीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच युवतीच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आदिवासी महासंघाचे नंदुरबार तालुका युवाध्यक्ष अक्षय गवळी, पंकज गांगुर्डे, शैलेष खैरनार, प्रमोद पवार, टिकेश सूर्यवंशी, किरण बहिरम, दिनेश कोकणी, विशाल भोये आदींनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.