ETV Bharat / state

Mpsc Result : कुंकू, करदोडे विकून झाला पीएसआय, खडतर प्रवासानंतर तीन विद्यार्थ्यांचे पीएसआयचे स्वप्न पूर्ण

author img

By

Published : Jul 8, 2023, 7:40 PM IST

Mpsc Result
Mpsc Result

जिल्ह्यातील भोकर येथील कुंकू, करदोडे विक्री करणाऱ्या सादुलवार दांपत्याच्या तिन्ही मुलांनी विविध क्षेत्रात यश संपादन करून आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. भोकर शहरातील बंडू व्यंकटेश सादुलवार यांचा एक मुलगा भारतीय हवाई दलात तर, दुसरा मुलगा सीए, तर तिसरा मुलगा किशोर सादुलवार एमपीएससी उत्तीर्ण झाल्याने नांदेड जिल्ह्यात त्याचे कौतुक होत आहे.

किशोर सादूलवार, माधव लाकडे यांची प्रतिक्रिया

नांदेड : प्रत्त्येकाला जीवनात अनेक खडतर प्रवासाला सामोरे जावे लागते. मात्र, या खडतर प्रवासावर मात करुन यश संपादन करणे प्रत्येकाला शक्य असते. त्यासाठी जिद्द, धेय, चिकाटी असेल तर, जीवनात नवी पहाट होण्यासाठी वेळ लागत नाही. असाच काहीसा प्रकार नांदेड जिल्ह्यातील भोकर गावातील तीन भावंडानी करुन दाखवला आहे. भोकर येथील कुंकू, करदोडे यासारखे साहित्य विकणाऱ्या व्यक्तीच्या तिन्ही मुलांनी विविध क्षेत्रात यश संपादन करून आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. बंडू व्यंकटेश सादुलवार यांचा एक मुलगा भारतीय वायुदलात, दुसरा मुलगा सीए, तिसरा मुलगा किशोर एमपीएससी पास झाल्याने जिल्ह्यात कौतुक होत आहे. खडतर संघर्षातून यश मिळविणाऱ्या माधव लाकडे, अतुल आडे यांचेदेखील कौतुक होत आहे.

तिन्ही मुलांना शिक्षण उच्च शिक्षण : भोकरमध्ये डोक्यावर टोपली घेऊन पारंपरिक व्यवसाय करून बंडू सादुलवार दाम्पत्याने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कष्ट घेतले. त्यांचा पहिला मुलगा भारतीय वायुदलात, दुसरा सीए, तर तिसरा मुलगा किशोर यांची महाराष्ट्र पोलिस सेवेत पोलीस उपनिरीक्षक पदावर नुकतीच निवड झाली आहे. ३० वर्षांपासून बंडू सादुलवार यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुंकू, करदोडे, कटलरी सामग्री डोक्यावर घेऊन पारंपरिक व्यवसाय केला आहे. कष्ट करून त्यांनी तिन्ही मुलांना शिक्षण दिले. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. मुलगा ज्ञानेश्वर वायुदलात २०१६ पासून कार्यरत आहे. दुसरा मुलगा अमोल हा सीए होऊन खासगी व्यवसाय करीत आहे.

कुंकू-करदोडे विकणाऱ्या कुटुंबातील किशोर झाला पीएसआय : किशोर वडिलांना हातभार लावण्यासाठी गाड्यावर बसायचा. आई-वडिलांनी देखील काबाडकष्ट करुन किशोरचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. त्याची अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यानुसार त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. वेळ मिळेल तेव्हा, तो अभ्यास करायचा. २०२१ साली त्याने पीएसआयची परीक्षा दिली. त्यात त्याने यश मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी मजल मारली. हलाखीच्या परिस्थितीला मात करत किशोर सादूलवारने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या मुलाने स्वप्न पूर्ण केल्याने आई-वडिलांचा आनंद द्विगणीत झाला आहे.

मनात जिद्द ठेवा, यश मिळेल : पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेल्या किशोरचे शिक्षण भोकरमध्येच पूर्ण झाले. परिस्थिती बिकट असली तरी, कुटुंबातील आई-वडील, भाऊ यांचे सहकार्य लाभल्याने यश मिळाले आहे. पोलीस सेवेचे कर्तव्य बजावत उच्च पदस्थ अधिकारी होण्याची इच्छा असणाऱ्या होतकरू गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आश्वासन किशोरने दिले आहे.

शेतात काम करुन झाला पीएसआय : टाकळी गावातील माधव लाकडे हा तरुण गावात सध्या कौतुकाचा विषय झाला आहे. शेतात काम करत माधवने मिळवलेल्या यशाची चर्चा सध्या सगळेच जण करता आहेत. टाकळी गावातील माधव लाकडे यांनी देखील खडतर प्रवासातून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान मिळवला. शेतात काम करून माधवने एमपीएससीमार्फत पीएसआय पदाची परीक्षा दिली. त्यात त्याने यश मिळविले आहे. माधवच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आपल्या कुटुंबियांसोबत तो शेतात काम करायचा. विशेष म्हणजे ज्या दिवशी पीएसआय परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्या दिवशी तो शेतात काम करत होता. त्याच्या मित्राने परीक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजताच लाकडे कुटुंबिय आंनदीत झाले. हलाखीच्या परिस्थितीत ही जिद्द, मेहनतीने यश मिळविणाऱ्या माधवचे गावकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

आईच्या कष्टाचे केले चीज : अतुल आडे हा जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वायवाडी तांडा येथील रहिवासी आहे. तो अकरावीला असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या अकाली जाण्याने आडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने अंकुश, अतुल हे दोघे भाऊ पुण्याला कंपनीमध्ये काम करत होते. वडील आपल्याला सोडून गेले, तेव्हा आई एकटी कशी राहील? त्यामुळे त्यांनी पुणे सोडण्याचा विचार केला. त्यानंतर घरी परतले. पुढे शिक्षण घेऊन कोणती तरी, छोटी मोठी पोस्ट मिळवावी अशा अपेक्षेने तो पळसगाव तांडा येथे आपल्या मावशीकडे शिक्षण घेण्यासाठी गेला. या ठिकाणी दोन वर्ष राहून त्याने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. एक वर्ष रेल्वेने हिमायतनगर ते नांदेड रोज प्रवास केला. आईने देखील शेतात मोलमजुरी करुन मुलाला शिकविले. जिद्द, मेहनतीच्या जोरावर अतुलने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

हेही वाचा - MPSC Result : सासरच्या पाठिंब्याने तिसऱ्यांदा एमपीएससी परीक्षेत यश, ऐश्वर्या नाईक-डुबल यांची महापालिका मुख्याधिकारीपदी निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.