ETV Bharat / state

नांदेडच्या सखल भागात पाणी; विष्णुपूरी धरणाचे सहा दरवाजे उघडले

author img

By

Published : Jul 23, 2021, 9:49 PM IST

Updated : Jul 23, 2021, 10:34 PM IST

विष्णूपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडल्याने गोदावरी नदी धोकादायक पातळीच्या जवळून वाहत आहे. नांदेड शहरात मनपाची आपत्ती निवारण व्यवस्था कुचकामी ठरल्याने जागोजागी पाणी साचले आहे.

Vishnupuri Dam
विष्णुपूरी धरण

नांदेड - नांदेडमध्ये पावसाची संततधार सुरूच असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. विष्णूपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडल्याने गोदावरी नदी धोकादायक पातळीच्या जवळून वाहत आहे. त्यामुळे नांदेड शहरातील गोदावरी नदीवरचा छोटा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

विष्णुपूरी धरणाचे सहा दरवाजे उघडले

नालेसफाई नसल्यामुळे शहरवासीयांचे हाल?

नांदेड शहरात मनपाची आपत्ती निवारण व्यवस्था कुचकामी ठरल्याने जागोजागी पाणी साचले आहे. नांदेडमध्ये नालेसफाई झाली नसल्याने शहरवासीयांचे हाल होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. तर दुथडी भरून वाहणाऱ्या गोदापात्राजवळ कुणी जाऊ नये, म्हणून जीवरक्षक दल डोळ्यात तेल टाकून पहारा देतानाचे चित्र नांदेडमध्ये दिसत आहे.

धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक पाऊस-

नांदेड जिल्ह्यात आज (२३ जुलै) सकाळी आठपर्यंतच्या अहवालानुसार संपलेल्या २४ तासात धर्माबाद येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धर्माबाद महसूल मंडळात ८६ मिलीमीटर नोंदवला गेला आहे. त्या खालोखाल बिलोली ६४ मिलीमीटर, हिमायतनगर आणि नायगावमध्ये प्रत्येकी ५० मिलीमीटर, मुदखेड ३४ मिलीमीटर, उमरी २९ मिलीमीटर, किनवट २५ मिलीमीटर, देगलूर १८.४० मिलीमीटर, हदगाव १७ मिलीमीटर, कंधार आणि मुखेड १४ मिलीमीटर, भोकर १३ मिलीमीटर, अर्धापूर ८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील शेकडो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.

पाटबंधारे मंडळातील धरणात 62 टक्के पाणीसाठा -

पाटबंधारे मंडळातर्गंत निम्न मानार प्रकल्पात 83 टक्के, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात (इसापूर धरण) 63.32 टक्के, येलदरी धरणात 69.57 टक्के, विष्णुपूरी प्रकल्पात 75 टक्के इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. तर मंडळातर्गंत मध्यम प्रकल्पात 60.59 टक्के, नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात 71.65 टक्के जिल्ह्यातील 88 लघू प्रकल्पात 57.59 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातून तेलंगणा राज्यात 1 हजार 291 दलघमी पाणी वाहून गेले आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. कों. सब्बीनवार यांनी दिली.

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 29.2 मि.मी. पाऊस -

नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 29.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात एकूण 360.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे -

कंसात एकूण पाऊस : नांदेड- 29.6 (361.7), बिलोली- 60.3 (437.4), मुखेड- 14.4 (318.6), कंधार-17.1 (324.6), लोहा-25.7 (362.3), हदगाव-15.9 (311.4), भोकर- 20.3 (370.8), देगलूर-31 (330.7), किनवट- 21.9 (438), मुदखेड- 37.9 (397), हिमायतनगर-55.4 (373), माहूर- 3 (284), धर्माबाद- 87.7 (427.4), उमरी- 32.3 (398.7), अर्धापूर- 10.2 (378.9), नायगाव- 42.2 (352.5) मिलीमीटर आहे.

Last Updated :Jul 23, 2021, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.