ETV Bharat / state

रेल्वे मार्गावरील सर्व भुयारी मार्गास मान्यता - खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

author img

By

Published : Mar 14, 2022, 7:27 PM IST

Prataprao Patil Chikhalikar meeting
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर बैठक

नांदेड जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर असलेली रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी व त्या-त्या ठिकाणच्या जनतेला दळणवळणाच्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने सर्व ठिकाणच्या भुयारी मार्गास मंजूरी मिळाल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MP Prataprao Patil Chikhalikar) यांनी दिली.

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर असलेली रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी व त्या-त्या ठिकाणच्या जनतेला दळणवळणाच्या सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने सर्व ठिकाणच्या भुयारी मार्गास मंजूरी मिळाल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MP Prataprao Patil Chikhalikar) यांनी दिली. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत ते बोलत होते.

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस खासदार सुधाकरराव श्रृंगारे, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, दिशा समितीचे सदस्य बालाजी पाटील पुणेगावकर, अनिल पाटील बोरगावकर, प्रकाश तोटावाड, शिरिष देशमुख गोरठेकर, सुनीताताई गणेशराव शिंदे, मारोती सुंकलवाड आदी सदस्य व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गासह ज्या-ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या रेल्वे मार्गावर आवश्यक ठिकाणी उड्डाणपुलासह प्राधान्यक्रम देऊन तात्काळ कार्यवाही करू असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अश्वासीत केले आहे. केंद्रीय पातळीवरील नांदेड जिल्ह्यातील रस्ते वाहतूकीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जाईल. याचबरोबर प्रदुषण मुक्त भारतासाठी नांदेड जिल्ह्याचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. यात घरगुती गॅस पाईप लाईनने जिल्ह्यातील 8 लाख कुटुंबांना जोडले जात असून यासाठी सुमारे 1200 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या बैठकीत सांगितले.

विविध विकास कामांचा आढावा -

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या विकास योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्या योजना तातडीने पूर्ण कशा होऊ शकतील याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याची नवी योजना ही चांगली असून याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आजवर ग्रामीण भागात अनेक पाणी पुरवठ्याच्या योजना होऊ गेल्या. याची प्रभावी अंमलबजावणी होण्याची जबाबदारी सर्व संबंधित यंत्रणेने घेऊन सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. तुषार राठोड यांनी केले. आमदार राजेश पवार यांनीही मनरेगा व इतर योजनांबाबत आढावा घेऊ सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे सांगितले.

या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आदी योजनांचा जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्या-त्या योजनांबाबत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विभाग प्रमुखांना सूचना केल्या. या बैठकीत दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन, अनुपालन व त्यास मान्यता दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.