ETV Bharat / state

नांदेडहून यात्रेकरू निघाले पंजाबला, इंदूरमध्ये अडवून परत पाठवले नांदेडला; ९० यात्रेकरुविरुद्ध गुन्हा दाखल...

author img

By

Published : Apr 22, 2020, 11:27 AM IST

भाविकांना आपल्या घराचे वेध लागल्याने त्यांनी खासगी वाहन किरायाने ठरवून पंजाबकडे जाण्यासाठी निघाले. नांदेडमध्ये असलेल्या यात्रेकरुंपैकी ९० जण सहा वाहनातून पंजाबच्या लुधियाना शहराकडे निघाले असता, मध्यप्रदेशातील इंदूर येथे तपासणीदरम्यान त्यांना अडविण्यात आले.

Nandu
गुरुद्वारा

नांदेड - घरी जाण्यासाठी संचारबंदी तोडून नांदेडहून पंजाबकडे निघालेल्या यात्रेकरूंना इंदूर येथे अडवण्यात आले. याबाबतची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी ९० यात्रेकरूंविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. संचारबंदी घोषित झाल्यानंतर पंजाबमधून नांदेड येथे आलेले जवळपास साडेतीन हजार यात्रेकरु अडकून पडले आहेत. यात्रेकरुंच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येऊन संचारबंदी संपेपर्यंत नांदेड येथेच राहण्याचे सूचित करण्यात आले आहे.

नांदेड येथे येऊन बराच दिवसाचा कालावधी लोटत-आल्याने घर जवळ करण्यासाठी यात्रेकरुंचे प्रयत्न सुरू आहेत. मुळात गुरुद्वारा बोर्ड व लंगर साहिब गुरुद्वारा यांनी या भाविकांना सुरक्षितपणे पंजाबला पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांचे वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पण हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशातच भाविकांना आपल्या घराचे वेध लागल्याने त्यांनी खासगी वाहन किरायाने ठरवून पंजाबकडे जाण्यासाठी निघाले. नांदेडमध्ये असलेल्या यात्रेकरुंपैकी ९० जण सहा वाहनातून पंजाबच्या लुधियाना शहराकडे निघाले असता, मध्यप्रदेशातील इंदूर येथे तपासणीदरम्यान त्यांना अडविण्यात आले. सदर यात्रेकरू हे नांदेडहून आल्याची बातमी तेथील स्थानिक पातळीवर प्रसिद्ध झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी दखल घेऊन गुन्ह्याची नोंद केली. या प्रकारानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

यात्रेकरुंनी चार दिवसांपूर्वीच नांदेड सोडले असताना त्याची माहिती पोलिसांना मिळू शकत नाही, ही बाब शंका निर्माण करणारी ठरू शकते. विशेष म्हणजे शहरात जागोजागी रस्ते अडविण्यात आलेले आहेत. जिल्ह्याच्या सीमा बंद करून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला असताना पोलिसांचा चक्रव्यूह भेदून सहा गाड्या जिल्ह्याच्या बाहेर जातात कशा ? यातून त्यांची कुठेही तपासणी झाली नाही, हे स्पष्ट होत आहे. यामुळे यात्रेकरुंशिवाय आणखी किती जण जिल्ह्याच्या बाहेर गेले किंवा जिल्ह्यात आले, याचा शोध घेणेही आवश्यक बनले आहे. नांदेडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. इंदूर येथे अडकलेल्या यात्रेकरूंवर गुन्हा दाखल करून पोलीस यंत्रणा नामानिराळी झाली. परंतु हे यात्रेकरू बाहेर कसे पडले हा प्रश्न कायम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.