ETV Bharat / state

नरसीत ओबीसी करणार एल्गार ; साठ एकरात महामेळावा घेऊन समाज करणार शक्तिप्रदर्शन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 7:21 AM IST

Updated : Dec 30, 2023, 12:42 PM IST

OBC Rally in Narsi : मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजही अरक्षणावरुन आक्रमक झालाय. ओबीसी आरक्षणावर येऊ घातलेलं अतिक्रमण त्वरित थांबवा, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरित करा, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या सात जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील नरसी इथं आरक्षण बचाव ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आलाय.

OBC Rally in Narsi
संग्रहित छायाचित्र

ओबीसी महामेळावा

नांदेड OBC Rally in Narsi : एकीकडं महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालेला असताना दुसरीकडं ओबीसी आरक्षणावर येऊ घातलेलं अतिक्रमण त्वरित थांबवा, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरित करा, या प्रमुख मागण्यांसाठी येत्या सात जानेवारीला नांदेड जिल्ह्यातील नरसी इथं आरक्षण बचाव ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आलाय. या महामेळाव्याला तब्बल पाच लाखाहून अधिक ओबीसी बांधव उपस्थित राहतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत महामेळाव्याच्या संयोजन समितीच्या वतीनं देण्यात आलीय.

काय म्हणाले संयोजक : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणातून अन्य समाज घटकाला आरक्षण देण्याच्या मागणीनं जोर धरलाय. या अनुषंगानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलनं सुरु आहेत. यामुळं ओबीसी प्रवर्गातील 374 जातींच्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाल्यानं ओबीसी आरक्षणातून कोणालाही आरक्षण देण्यात येऊ नये, असा पवित्रा ओबीसी नेत्यांनी घेतलाय. महाराष्ट्राचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर ओबीसी आरक्षण बचावचे महामेळावे आणि सभा होत आहेत. याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी इथं दिनांक 7 जानेवारीला आरक्षण बचाव ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिलीय.


मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार : या महामेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर, प्रकाश शेंडगे, प्रा. टी पी मुंडे, आ. विनय कोरे, आ. विजय वडेट्टीवार, आ. महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, शब्बीर आन्सारी, आ. तुषार राठोड, बबनराव तायवाडे, चंद्रकांत बावकर, राजाराम पाटील, लक्ष्मणराव गायकवाड, विजयराव चौगुले, कल्याणराव दळे, जे डी तांडेल, प्रा. लक्ष्मणराव हाके, मच्छिंद्र भोसले, नागोराव पांचाळ, डॉ मारोतराव क्यातमवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि पुढारी उपस्थित राहणार आहेत.

साठ एकराहून अधिक जागेवर होणार महामेळावा : आरक्षण बचाव ओबीसी महामेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून तब्बल साठ एकराहून अधिक जागेवर हा महामेळावा होईल. पाच लाखापेक्षा अधिक समाजबांधव या महामेळायला उपस्थित राहणारा असून नांदेड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात मेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगानं जनजागृती करण्यात आलीय. पाच हजार स्वंयसेवक नियुक्ती करण्यात आली तर 21 कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत. या सभेसाठी दोन भव्य स्टेज उभारण्यात येणार असून एका स्टेजवर प्रसिद्ध शाहीर सचिन माळी आणि शीतल साठे यांच्या शाहिरीचा जलसा रंगेल तर दुसऱ्या स्टेजवर मान्यवरांची मनोगत व्यक्त होतील. मेळाव्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ओबीसी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून नाश्त्याची ही सोय करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. मराठा समाजाला दिलेले कुणबी दाखले रद्द करा, प्रकाश शेंडगे यांची मागणी
  2. मुंबईत ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटणार? आंदोलनाच्या परवानगीसाठी दोन्ही समाजाचे शिष्टमंडळ मायानगरीत
Last Updated :Dec 30, 2023, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.