नांदेड - देगलूर-बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय-६३ वर्ष) यांचे आज (शनिवारी) मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना गेल्या 25 दिवसापासून कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते कॉंग्रेस व अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक होते.
2009 मध्ये पहिल्यांदा आले निवडून
सन 2009 मध्ये देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. विधानसभा मतदार संघ निर्माण झाल्यावर रावसाहेब अंतापूरकर पहिल्यांदा देगलूरचे आमदार म्हणून निवडून आले. तत्कालीन वरीष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्य केले. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला यावेळी सुभाष साबणे निवडून आले होते. यावेळी रावसाहेब अंतापूरकर यांनी पराभव पत्करुन लोकसंपर्क व अनेक विकासात्मक काम सुरु ठेवले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले.
आ.अंतापूरकर यांचा अल्पपरीचय
रावसाहेब अंतापूरकर यांचा जन्म देगलूर पासून जवळच असलेल्या अंतापुरकर या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मानव विकास विद्यालय देगलूर या ठिकाणी पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले व नंतर ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या विभागात अभियंते म्हणून कार्यास सुरुवात केली. नंतर तेथील राजीनामा देऊन ते देगलूर बिलोली हा राखीव मतदारसंघ झाल्याने राजकारणात प्रवेश केला. यावेळी त्यांना भास्करराव पाटील खतगावकर यांची साथ मिळाली होती. भास्करराव पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीस हजार मतांनी निवडून येऊन आमदार सुभाष साबणे यांचा पराभव केला. त्यांच्या माध्यमातून देगलूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे झाली आहेत.
25 दिवसांपूर्वी झाले कोरोनाबाधित
अंतापूरकर हे 25 दिवसांपूर्वी कोरोनाबधित झाले होते. तेव्हा स्वतः त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते. नांदेड येथील भगवती रुग्णालयात 3 दिवस उपचार घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे ऍडमिट केले. मागील 8 दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. मूळगाव अंतापूर याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. तर अंत्यविधीला लोकांनी गर्दी न करण्याचे आवाहन त्यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांनी केले आहे.