ETV Bharat / state

दुहेरी हत्याकांड; पतीने सासरवाडीत जाऊन पत्नीसह चिमुकल्याचा निर्घृणपणे कापला गळा

author img

By

Published : May 27, 2020, 3:46 PM IST

Crime
मृत पत्नी आणि मुलगा

माहेरात राहणाऱ्या पत्नीला आणायला गेलेल्या पत्नीसोबत पतीचा वाद झाला. या वादातून पतीने पत्नीसह चिमुकल्या मुलाचा गळा चिरुन खून केला. याबाबतची माहिती कळताच गावात खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळावर जमा झालेल्या नागरिकांनी तानाजीला बांधून ठेवले.

नांदेड - पतीने सासरवाडीला जाऊन पत्नी व एक वर्षाच्या चिमुकल्याचा चाकुने गळा चिरुन खून केल्याने खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी मुखेड तालुक्यातील मंडळापूर येथे घडली. तानाजी भुताळे असे खुनी पतीचे तर आदेश भुताळे असे चिमुकल्याचे तर वैशाली भुताळे असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

तानाजी आणि वैशाली यांच्यात काही कारणावरुन कौटुंबिक कुरबुरी सुरू होत्या. या वादातून वैशाली माहेर असलेल्या मंडळापूर (ता. मुखेड ) येथे निघून गेली होती. बुधवारी सकाळी तानाजी हा दारुच्या नशेत होता. तसाच तो मुखेड - देगलुर रोडवर असलेल्या मंडलापूर येथील शिवारात असलेल्या सासरवाडीत आला. पत्नी वैशालीकडे गावी येडूर( ता. देगलूर ) येथे जाण्यासाठी त्याने तगादा लावला. मात्र वैशालीने गावाकडे येण्यास नकार दिला.

पळणाऱ्या मारेकरी पतीला नागरिकांनी ठेवले बांधून

या वादातून रागात त्याने पत्नीसह एक वर्षाचा मुलगा आदेशच्या गळ्यावर चाकुने वार करुन खून केला. याबाबतची माहिती कळताच गावातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. यावेळी तानाजीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गावातील नागरिकांनी त्याला पकडून झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेबाबत कळताच पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आई आणि मुलाची गाळा चिरून हत्या झाल्याची घटना कळताच मुखेडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तानाजीला पोलिसांनी घटनास्थळावरुन अटक केली आहे. पुढील तपास मुखेड पोलीस करत आहेत.

नांदेड जिल्ह्यात पाच दिवसातच दुहेरी खुनाच्या दोन घटना

बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांसह भगवान शिंदे यांची शनिवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथे घडल्याने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या घटनेतील मारेकऱ्याला अटक होईपर्यंत पार्थिव ताब्यात न घेण्याचे गावकऱ्यांनी ठरवले होते. त्यानंतर या घटनेतील मारेकरी साईनाथ लिंगाडे याला तेलंगणातील तानूर येथून पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.