ETV Bharat / state

Monsoon Rain Nanded : नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद; कुठे तलाव फुटला तर कुठे उखडले रस्ते,जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

author img

By

Published : Jul 22, 2023, 12:46 PM IST

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे तलाव फुटले, तर कुठे रस्ते उखडले, छत कोसळल्याच्या घटनाही घडल्या. नांदेडमधील 62 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी धर्माबाद तालुक्यातील बनाळी या पूरग्रस्त गावाला भेट दिली.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड: पावसाने दुसऱ्या दिवशीही नांदेड जिल्ह्यात चांगलाच हाहाकार उडाला आहे. शुक्रवारी दिवसभर रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. रात्री मात्र मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी तलाव आणि नद्यांना पूर आल्याच्या घटना घडल्या. नांदेड जिल्ह्यात सरासरी 64.80 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. नांदेडमध्ये आतापर्यंत 327.2 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान शुक्रवारी झालेल्या पावसामुळे बिलोली, देगलूर मुखेड, आणि धर्माबाद या चार तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी धर्माबाद तालुक्यातील बनाळी या पूरग्रस्त गावाला भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांची पूरग्रस्त भागाची पाहणी
जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांची पूरग्रस्त भागाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : नांदेड जिल्ह्यात सरासरी 64.80 मि.मी. पावसाची नोंद झाली. बिलोली, देगलूर आणि हिमायतनगर या तालुक्यात 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. बिलोली आणि मुखेड तालुक्यात तलाव फुटण्याच्या घटना घडल्या असून अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. पुरामुळे नांदेड-हैदराबाद या मुख्य रस्त्यावरील वाहतूकदेखील ठप्प झाली आहे. देगलूर तालुक्यात सर्वाधिक 152.30 मिमी, बिलोली तालुक्यात 109.30 मिमी आणि हिमायतनगर तालुक्यात 105.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. बिलोली तालुक्यातील येसगी येथे मांजरा नदीला पूर आल्याने नांदेड-हैदराबाद या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू करत त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मुखेड आणि देगलूर तालुक्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी नागरिकांच्या अडचणी समजून त्यांना धीर दिला.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस

पावसामुळे नागरिकांचे हाल : गंजगाव, कारला नाल्याच्या पुलाचे काम चालू होते. नदीत पाणी आल्याने काम करणाऱ्या मजुरांना झाडावर चढून मदतीची वाट पाहावी लागली. त्या ठिकाणी गंजगावातील नागरिकांकडून या मजुरांची सुटका करण्यात आली. देगलूर तालुक्यातील लख्खा येथील गावात पाणी आल्याने तेथील 30 ते 35 लोक गुरुद्वारा येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले आहेत. तसेच सुगाव येथील 15 ते 20 लोक सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहेत. बनाळी व सुन्दगी येथे काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम चालू आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

देगलूर शहर झाले जलमय : देगलूर तालुक्यात सर्वाधिक 152.30 मिमी इतका पाऊस झाला आहे. शहरातील दत्तनगर भागात रस्त्याचे काम चालू असल्यामुळे काही घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत पाणी उपसण्याचे काम सुरू होते. शहरातील ढाणकी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, नाग चौक, रहीम नगर, ताजपुरा वार्ड, तांबुळपुरा, शिवाजी वार्ड आदी ठिकाणी पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने ईसापूर धरणावरील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सर्वाधिक नुकसान मुखेड परिसरात झाले आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील तारदरवाडी येथील तलाव अतिवृष्टीमुळे फुटला आहे. पाण्याचा विसर्ग हा संथ गतीने राहिल्यामुळे पाणी एकदम बाहेर निघाले नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Monsoon Rain : आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, वसई विरारला रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट
  2. Water logging in Vasai Virar : वसई विरारच्या परिस्थितीला जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - खासदार राजेंद्र गावित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.