ETV Bharat / state

Ashok Chavan On Maratha Reservation : सरकारनं दाखवलंय गाजर, 'त्याशिवाय' मराठा आरक्षण मिळू शकत नाही; अशोक चव्हाणांचा दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 1:04 PM IST

Updated : Sep 8, 2023, 2:26 PM IST

Ashok Chavan On Maratha Reservation : राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला आहे. मात्र मराठा आरक्षण केंद्र सरकारवर अवलंबून असून जोपर्यंत राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात येत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळू शकत नसल्याचा दावा, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Ashok Chavan On Maratha Reservation
काँग्रेस नेते अशोक चव्हाण

काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी केला मोठा दावा

नांदेड Ashok Chavan On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील ( Maratha Reservation Protest ) यांनी सुरू केलेलं उपोषण राज्य सरकारपुढं अडचणीचं ठरलं आहे. त्यामुळे सरकारनं मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. मात्र हा विषय आता केंद्र सरकारशी संबंधित आहे, केंद्रानं घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नसल्याचा दावा मराठा आरक्षण उपसमीतीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.

आरक्षणाचा आकडा ५० टक्यावर गेल्यानं अडचण : ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यायचं आहे. पण मराठ्यांना तसं आरक्षण देताना हा हिशोब ५० टक्यावर चालला आहे. आरक्षण ५० टक्यावर जात असल्यानं घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही, असा उल्लेख शरद पवार यांनी देखील केल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. ईडब्ल्यूएसमध्ये १० टक्के आरक्षण दिलं, त्याच पद्धतीनं मराठा आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार असल्याचं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे. मराठवाड्यात कुणबी म्हणून जुने दाखले आहेत. पण उर्वरित महाराष्ट्राचं काय, असा प्रश्न माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. शिवाय हा विषय देखील कायदेशीर पेचात अडकण्याची शक्यता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावर पुन्हा न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तुम्ही टिकणारं आरक्षण देऊ असं सांगितलं, तर टिकणारं आरक्षण द्या असंही अशोक चव्हाण म्हणाले.

जातिनिहाय जनगणनेची काँग्रेसची मागणी : मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यांच्या मागणीला माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे. जातिनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची जाहीर मागणी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जातीनिहाय काय परिस्थिती आहे, ते देशासमोर येईल, असं अशोक चव्हाण म्हणाले.

आरक्षण आणि दुष्काळ दोन्ही विषय गंभीर : आरक्षण आणि दुष्काळ हे दोन्ही विषय गंभीर आहेत. त्यामुळे सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून हे विषय गांभीर्यानं घ्यावेत असंही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे, त्यापूर्वी अधिवेशन बोलावून निर्णय झाला तर योग्य होईल, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

भारत-इंडिया वाद करायचं कारण नाही : इंडिया नाव बदलून भारत करण्याची चर्चा सुरू आहे. मात्र इंडिया-भारत वाद करायचं कारण नाही. भाजपाच्या अनेक घोषणा आहेत. सरकारच्या अनेक योजना इंडिया नावानं आहेत. मग त्याचं काय करायचं, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. इंडिया नावावरुन अचानक भूमिका बदलण्याचं कारण काय, असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Ashok Chavan On Election: महाराष्ट्रातील राजकीय स्थिती काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी अनुकूल - अशोक चव्हाण
  2. Ashok Chavan On Maratha Reservation : ...तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणे अशक्य - अशोक चव्हाण
Last Updated : Sep 8, 2023, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.