ETV Bharat / state

भारत बंद : उपराजधानी नागपुरात 'बंद'चा प्रभाव नाही

author img

By

Published : Dec 8, 2020, 10:11 AM IST

Nagpur
नागपूर

आज 8 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांकडून ‘भारत बंद’ आंदोलन करण्यात येत आहे. याला अनेक राजकिय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, नागपुरात सकाळी दहा वाजेपर्यंत बंदचा कोणाताही परिणाम दिसला नाही.

नागपूर - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांसह राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या कायद्याविरोधात आज शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. याला अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, उपराजधानी नागपुरात अजूनपर्यंत तरी भारत बंदचा कुठलाच परिणाम दिसून आलेला नाही. इतर दिवसांप्रमाणे आज सकाळी देखील नागपुरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ दिसून येत आहे.

उपराजधानी नागपुरात 'बंद'चा प्रभाव दिसला नाही

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला राजकीय आणि सामाजिक संघटनांचे समर्थन प्राप्त झाले आहे. आज अनेक राजकीय पक्षांकडून आंदोलन केली जाणार आहेत. भारत बंदच्या अनुषंगाने दोन मतप्रवाह वाहू लागले आहेत. एका गटाने या बंदला समर्थन दिले आहे तर, काहींनी यावर असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे बंदला नागपूर किती प्रतिसाद मिळतो हे ११ वाजल्याच्या नंतरच स्पष्ट होणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू -

भारत बंदच्या अनुषंगाने आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आज सकाळपासूनच शहर बस सेवेसह मेट्रो सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमानी आपल्या कामावर अगदी आरामात पोहचत आहेत.

भारत बंदला विविध पक्षांचा पाठिंबा -

शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टी, तेलंगण राष्ट्र समिती आणि महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्ली, तेलंगणा आणि महाराष्ट्रात हा बंद मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याची चिन्हे आहे. यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआय, राष्ट्रीय लोकशाही पार्टी, डीएमके, आरजेडी, जेएमएम, आरएसपी या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. तृणमुल काँग्रेस, कमल हासन यांच्या मक्काल निधि मय्यम या पक्षांनी देखील पाठिंबा दर्शवला असून आजचा बंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते काम करतील.

मुंबईतही व्यापाऱ्यांचा सहभाग नाही -

एफआरटीडब्ल्यूएने महाराष्ट्रात बंद पुकारलेला नाही. बंद पाळायचा की नाही, हा निर्णय व्यापाऱ्यांनी घ्यायचा आहे. आम्ही यापुढे कोणत्याही व्यवसायाच्या नुकसानाला समर्थन देत नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.