'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेतून शेतकऱ्यांचा सन्मान

author img

By

Published : Jul 11, 2020, 6:57 PM IST

honoring-farmers-through-thet-shetkaryachya-bandhavar-campaign-in-nagpur
'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेतून शेतकऱ्यांचा सन्मान.. ()

दरवर्षी १ हजार फळझाडांची लागवड करून शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थेने केला आहे. सध्या शेतकरी कृतज्ञता सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे. सततच्या नापिकीमुळे निराशेच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरू झालेल्या या मोहिमेला चांगले यश मिळताना दिसत आहे.

नागपूर- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ही संकल्पना आता अस्तित्वात येताना दिसत असली तरी शेतकरी बांधव ही संकल्पना आधीपासूनच राबवत असल्याचा इतिहास आहे. मात्र, सध्या परिस्थिती बदलली आहे. शेतकरी वर्ग कायम पडद्याच्या मागे राहूनच आपली भूमिका चोखपणे बजावत आलेला आहे. कोरोनासारख्या घातक महामारीच्या संकटात सुद्धा जगाचा पोशिंदा समजला जाणारा बळीराजा शेतात अविरतपणे राबतो आहे. शेतात पिकेल, तर जगाच्या ताटात पडेल या भावनेतून शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (वन्हार्टी) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे.

'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेतून शेतकऱ्यांचा सन्मान..

दरवर्षी १ हजार फळझाडांची लागवड करुन शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न सुद्धा या संस्थेने केला आहे. सध्या शेतकरी कृतज्ञता सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे. सततच्या नापिकीमुळे निराशेच्या गर्तेत गेलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरू झालेल्या या मोहिमेला चांगले यश मिळताना दिसत आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून ही संस्था काम करत आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी संस्थेकडून प्रोत्साहीत केले जात आहे. शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, शेतकऱ्यांना आत्मबळ मिळावे, त्यांचे मनोधैर्य उंचावले जावे, आधुनिक शेतीतंत्र समुपदेशन थेट बांधावर मिळावेत, यासाठी दरवर्षी कृषीदिनाच्या औचित्याने 'थेट शेतकऱ्याच्या बांधावर' या मोहिमेचे प्रवर्तक एकनाथ पवार आणि वसंतराव नाईक मानवी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्था (वन्हार्टी) द्वारा थेट बांधावर शेतकरी सन्मान व समुपदेशनाचा कार्यक्रम राबविण्यात येतो.

एकनाथ पवार यांच्या या अभिनव संकल्पनेची दखल राज्य विधीमंडळात सुद्धा घेण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर, कळमेश्वर, नरखेड तालुक्यात जाऊन या संस्थेने शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात जीवती, कोरपना, यवतमाळमध्ये पुसद, घाटंजी व दिग्रस, वाशिममध्ये मानोरा, मंगरुळपीर, अकोला जिल्ह्यामध्ये पातूर, तर नांदेड जिल्ह्यात माहूर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी कृतज्ञता कार्यक्रम घेतला जात आहे. शेतकऱ्यांना मास्क सॅनिटाझर, फळझाडे व कृषी साहित्य देऊन हा सन्मान करुन आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.