ETV Bharat / state

Nagpur News: संपाचा 'या' रूग्णालयाला बसला मोठा फटका; सहा दिवसांत 109 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Mar 21, 2023, 2:09 PM IST

जुन्या पेंशन योजनेसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यामध्ये वैद्यकीय कर्मचारी देखील सहभागी होते. या सात दिवसांच्या संपाचा सर्वाधिक फटका हा वैद्यकीय सेवेला बसला आहे. सहा दिवसात 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना आरोग्य सेवा कर्मचारी संपावर गेल्याने फटका बसला आहे.

Nagpur News
मेयो मेडिकल रुग्णालय

नागपूर : या आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य विभाग महसूल, कृषी, ग्रामविकास आणि पाणीपुरवठा तसेच शिक्षण विभाग यामधील सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा, या मागणीच्या संपात शासकीय, निमशासकीय, शिक्षक आणि शिक्षकेत्तरसह वैद्यकीय सेवा देणाऱ्या परिचारिका आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते. मागणी अंशतः मान्य झाली. त्यानंतर सोमवारी तब्बल सात दिवसानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. मात्र, या सात दिवसात कुणाचे काय नुकसान झाले? याचा हिशोब देणारे किंवा मागणारे कुणीही नाही. या संपामुळे मृत्युची टक्केवारी वाढली आहे.

शस्त्रक्रिया रद्द : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) दोन रुग्णालयात संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणाच्या सीमावर्ती भागातून रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. व्हायरल ताप आणि इतर आजारांनी डोके वर काढले आहेत. त्यामुळे मेयो आणि मेडिकल रुग्णालय रुग्णांनी भरलेले आहेत. अश्यात रुग्णालयात काम करणारे क्लास 3 आणि 4 कर्मचारी, नर्सिंग स्टाफ संपात सहभागी झाल्यामुळे सहा दिवसात होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या होत्या.


109 रुग्णांचा मृत्यू : हा संप बेकायदेशीर आहे, या संपाला न्यायालयाने रोखावे, असा आरोप करीत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केली होती. संपामुळे या दोन रुग्णालयात सहा दिवसांत 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मेडिकलमध्ये 14 मार्च रोजी 12 तर मेयोमध्ये 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 15 मार्चला मेडिकल मध्ये 15 तर मेयोमध्ये दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 16 मार्च रोजी मेडिकलमध्ये सात तर मेयोमध्ये 03 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची नोंद आहे. 17 मार्चला मेडिकलमध्ये सर्वाधिक 23 मृत्यू झाले आहेत, तर मेयोत 04 मृत्यू झाले आहेत. 18 मार्चला मेयोमध्ये 4 तर मेडिकलमध्ये 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 19 मार्च रोजी मेडिकल आणि मेयोत मृत्यूचे आकडे वाढलेले बघायला मिळाले. मेडिकलमध्ये 18 तर मेयोत 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.



मृत्यूचे प्रमाण वाढले : मेयो आणि मेडिकल हे दोन रुग्णालये मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालयात आहेत. इथे दररोज हजारो रुग्ण येतात. मेयो मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान अनेकांचे मृत्यू होतात. मात्र, आरोग्य सेवा कर्मचारी गेल्याने मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले होते. आता संप मागे घेण्यात आला असल्याने आरोग्य सेवा पुन्हा रुळावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच या संपामुळे परीक्षा व दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम रखडले, त्यामुळे सोमवारी शिक्षकांनी थाळीनाद आंदोलन केले होते.

हेही वाचा : Teachers Thalinad Agitation : संपामुळे परीक्षा व दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम रखडले; सोमवारी शिक्षकांचे थाळी नाद आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.