ETV Bharat / state

Mumbai Terror Threat Call : मुंबईत तीन दहशतवादी दाखल झाल्याची खोटी माहिती देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक

author img

By

Published : Apr 14, 2023, 3:36 PM IST

मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणाऱ्या इसमाला दहशतवाद विरोधी पथकाने अहमदनगर येथून अटक केली आहे. यासीन सय्यद असे या इसमाचे नाव असून त्याला पुढील तपासासाठी आजाद मैदान पोलिसांकडे देण्यात आले आहे.

Yasin Syed Arrested
Yasin Syed Arrested

मुंबई : पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला तीन दहशतवाद्यांबाबत खोटी माहिती देणाऱ्या यासीन सय्यद नावाच्या व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली. पुढील तपासासाठी आरोपीला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यासीनने खोटे नाव सांगून मुंबईत दहशतवादी घुसल्याचा कॉल केला होता. याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू असून अशी अफवा पसरवण्यामागे त्याचा उद्देश काय होता यांचा तपास सुरू असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.


खोटा काॅल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल : मुंबईमध्ये तीन अतिरेकी घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा करणारा एक कॉल शुक्रवारी दुपारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात आला होता. या फोनने पोलिसांचे ढाबे चांगलेच दणाले होते. मुंबई पोलिसांनी या कॉलची दखल घेत मुंबईत हायअलर्ट जारी करत शहरातील बंदोबस्तात वाढ केली होती. तसेच, या काॅलची माहिती राज्यातील आणि केंद्रातील गुप्तचर, तपास यंत्रणांना देत पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी केलेल्या तपासात हा खोटा काॅल असल्याचे स्पष्ट झाले, असून काॅल करणाऱ्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या कॉलरचा अखेर एटीएसने शोध घेतला असून त्याला अटक करण्यात आली.

अनोखळी नंबरवरुन काॅल : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील दक्ष नागरीक बूथवर शुक्रवारी दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांनी एका अनोखळी नंबरवरुन काॅल आला. काॅल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव राजा ठोंगे असल्याचे सांगत दुबईवरून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आले आहेत. त्यांचा संबंध पाकिस्तानशी असे सांगत यातील एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याची माहिती त्याने दिली. सोबतच त्याने दोन मोबाईल क्रमांक, एक नऊ अंकी क्रमांक, एम.एच. १६ बीझेड ८०३२ असा गाडीचा नंबर पोलिसांना दिला. तसेच, या व्यक्तींचा दोन नंबरचा धंदा असल्याचाही दावा कॉलरने केला होता. पुण्यावरुन बोलत असल्याचे सांगून त्या व्यक्तीने काॅल कट केला. पोलिसांनी पून्हा त्याला काॅल करुन अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नाॅटरीचेबल झाला. अखेर पोलिसांनी ही माहिती सर्व स्थानिक पोलीस ठाण्यांना देत सतर्क राहाण्याच्या सुचना दिल्या. सोबतच शहरातील महत्वाच्या, अतिसंवेदनशील, तसेच गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करत पोलिसांनी संशयित व्यक्ती, वस्तू, वाहानांची तपासणी सुरु केली. सोबतच पोलिसांनी काॅल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरच्या आधारे त्याचा शोध सुरु होता.

नंबर दुसऱ्याच्याच नावावर : काॅल करण्यासाठी वापरण्यात आलेला नंबर हा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या व्यक्तीकडे चाैकशी केली असता त्याने आपण असा नंबर विकत घेतला नसल्याचे सांगितले. तसेच, काॅल करणाऱ्याने सांगितलेल्या राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचे त्यांनी सांगितले. काॅलमध्ये नाव सांगण्यात आलेल्या मुजीब सय्यद तसेच, मोबाईल नंबर, कार नंबर धारकांना ओळखत नसल्याचेही स्पष्ट केले होते.

गुन्हा दाखल : काॅल करणाऱ्या व्यक्तीने मोबाईल बंद केला होता. त्यामुळे पोलिसांनी काॅलरने सांगितलेल्या संशयित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याकडे कसून चाैकशी केली होती. मात्र संशयास्पद असे काहीच आढळले नाही. तसेच, त्यांनीही राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचे पोलिसांना सांगितले. अखेर हा खोटा काॅल खोटा असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात खोटे नाव सांगून खोटी माहिती देणाऱ्या काॅलरविरोधात भादंवि कलम ५०५ (१), ५०५(२) आणि १८२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - Indias Tallest Ambedkar Statue : मुख्यमंत्री केसीआर हैदराबादमध्ये 125 फूट उंच आंबेडकरांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.