ETV Bharat / state

जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, हिवाळी अधिवेशन दहा दिवसातच गुंडाळणार - वडेट्टीवार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 4:07 PM IST

Wadettiwar On Winter session : राज्य सरकार हिवाळी अधिवेशन गांभीर्यानं घेत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारला केवळ टाईमपास करायचा आहे. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सरकारला वेळ नाही. त्यामुळं सरकार दहा दिवसांत अधिवेशन गुंडाळत असल्याचं त्यांनी म्हटलंय आहे.

Opposition leader Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

मुंबई Wadettiwar On Winter session : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंत नागपूरमध्ये होणार आहे. याबाबत आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत निर्णय घेण्यात आला. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

सरकार पळ काढतंय : यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, किमान तीन आठवड्याचं अधिवेशन नागपूरला घ्यावं, अशी आमची मागणी होती. महाराष्ट्रामध्ये मोठे प्रश्न आहेत. शेतकरी संकटात आहे. बेरोजगारांचे प्रश्न आहेत, हॉस्पिटलचे प्रश्न आहेत, विनियोजन बिल, पुरवणी मागण्या यावर चर्चा करायची होती. अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर चर्चा करायची होती. त्यामुळं दहा दिवस चर्चा करण्यासाठी फार अपुरे आहेत. म्हणून आम्ही तीन आठवड्याचा आग्रह धरला, पण या सरकारनं त्यातून पळ काढला आहे. तीन आठवड्याच्या ऐवजी केवळ दोन आठवडे सरकारनं कामकाज ठेवलं आहे.

सरकार केवळ टाइमपास करतंय : विदर्भात कायदा, सुव्यवस्थेच्या अनेक समस्या आहेत. आदिवासी, दलितांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. त्यामुळं चर्चा करण्यासाठी वेळ हवा होता. मात्र सरकार गंभीर नाही. सरकारला केवळ टाईमपास करून वेळ मारून न्यायचा आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

द्वेषाचं राजकारण करू नये : शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्या अटकेबद्दल ते म्हणाले की, अटक अत्यंत चुकीची आहे. भावनेच्या भरात एखादी व्यक्ती एखादा शब्द बोलून गेली असेल, तर त्याबाबत अशा पद्धतीची कारवाई करणं चूक आहे. यापूर्वी अनेकांनी असं वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांची वक्तव्यं देखील अशीच होती. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. अशा पद्धतीनं कोणावर कारवाई करू नये, असंही वडेट्टीवार म्हणाले. अवकाळी पावसानं शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, याकडं कोणाचं लक्ष नाही. मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध धनगर असं भांडण लावण्याचं काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केलाय.

हेही वाचा -

  1. आरक्षण मिळालं तर राजीनामा देईल म्हणणारे गरळ ओकतात, नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांना टोला
  2. ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना भोवलं शिवीगाळ प्रकरण; 12 डिसेंबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी
  3. दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, धर्मवीरच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.