ETV Bharat / state

बारामतीच काय राज्यात शरद पवारांना पर्याय नाही; अजित पवारांच्या घोषणेवर शरद पवार गटाचा दावा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 8:11 PM IST

Ajit Pawar And Sharad Pawar
अजित पवार आणि शरद पवार

Ajit Pawar And Sharad Pawar : राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील लोकसभेच्या चार जागा लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, याचा काहीही परिणाम होणार नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाने दिलं असून, उलट महायुतीतच यामुळे तेढ निर्माण होईल ,असा दावा केला आहे.

प्रतिक्रिया देताना दत्ताजी देसाई

मुंबई Ajit Pawar And Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कर्जत येथे नुकत्याच झालेल्या शिबिरामध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातील महत्त्वाच्या लोकसभेच्या जागा लढणार आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागा असे निर्देश दिले होते. यामध्ये शिरूर लोकसभा रायगड, सातारा आणि बारामती या चार लोकसभा मतदारसंघांच्या तयारीसाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गट हा आक्रमक झाला आहे. यातील तीन खासदारकीच्या जागा या अजूनही शरद पवार गटाकडे आहेत. काहीही झाले तरी या जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार निवडून येतील अजित पवार यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांची डाळ शिजणार नाही. कारण महाराष्ट्रातील जनता काकाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नेत्याला स्वीकारणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेत्यांचे म्हणणं आहे.



अजित पवारांना जनता स्वीकारणार नाही : यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश चिटणीस दत्ताजी देसाई म्हणाले की, अजित पवार गटाने गुडघ्याला बाशिंग बांधून उतावळे होण्याची गरज नाही. मोदींची लाट असतानाही महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये उदयनराजे यांचे नाव असतानाही शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना विजयी करून दाखवले आहे. शरद पवार यांची पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील ताकद अद्यापही कमी झालेली नाही. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग राजकारणात कार्यरत आहे. गेली अनेक वर्ष शरद पवारांनी राज्यातल्या जनतेसाठी केलेल्या विविध कामांची जाण जनतेला आहे. त्यामुळे शरद पवार हे त्यांच्याकडे असलेल्या सातारा, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात निश्चितच उमेदवार निवडून आणतील. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याची स्वप्ने अजित पवार यांनी पाहू नये. बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे आणि तो कायम राहील. शिरूर लोकसभा मतदारसंघातील अमोल कोल्हे हे अजूनही आमच्यासोबत आहेत आणि या ठिकाणी दिलेल्या उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचा निवडून येईल. आजपर्यंत महाराष्ट्रात काकांना धोका देऊन गेलेल्या एकाही पुतण्याला यश मिळाले नाही, असेही देसाई यावेळी म्हणाले.




तर महायुतीत तिढा : अजित पवार (Ajit Pawar) यांनी चार लोकसभेच्या जागा घोषणा केल्यानंतर आता महायुतीतच संघर्षाला सुरुवात होईल. कारण यापैकी दोन जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. तर मावळ मतदार संघ ही शिवसेना सोडणार नाही. त्यामुळे आता हळूहळू महायुतीमध्येच वाद निर्माण होतील असेही देसाई म्हणाले.



शिरूर लोकसभेची जागा पवार गटाकडेच : शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार निवडणूक लढणार यापेक्षा ही जागा शरद पवार गट निश्चितच जिंकेल असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. अमोल कोल्हे हे अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचे जरी म्हटलं जात असले तरी, स्वतः कोल्हे यांनी याचा इन्कार करील शिरूर मतदार संघात शरद पवार गटाचा विजय निश्चित होईल असा दावा केला आहे.



काय आहे या मतदार संघाची स्थिती? : अजित पवार यांनी लढण्याची घोषणा केलेल्या चार मतदारसंघांमध्ये सध्या शिरूर मतदार संघ अमोल कोल्हे (Amol Kolhe) या शरद पवार गटातील खासदाराकडे आहे. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, आता पुन्हा या मतदारसंघातून आढळराव पाटील हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने सुप्रिया सुळे या शरद पवार गटाच्या खासदार निवडून येत आहे. 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांनी अत्यंत कमी मताच्या फरकाने महादेव जानकर यांच्यावर विजय मिळवला होता. मात्र, पुन्हा 2019 मध्ये कांचन कुल यांचा पराभव करताना हे मताधिक्य वाढले होते. आगामी निवडणुकीत सुनेत्रा पवार जर त्यांच्या विरोधात असतील तर त्यांना विजयासाठी निश्चितच संघर्ष करावा लागणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. उदयनराजे यांचा पराभव करून श्रीनिवास पाटील या शरद पवार गटातील खासदाराने विजय मिळवला होता आता या मतदारसंघात अजित पवार यांनी दाबा केला असला तरी, अद्यापही शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. रायगड मतदार संघात सुनील तटकरे हे अजित पवार गटात आहेत. त्यांनी अनंत गीते यांचा पराभव करून विजय संपादन केला होता. मात्र, या मतदारसंघावर तटकरे यांचा मोठा प्रभाव असल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जात आहे. असे असले तरी या मतदार संघात शिवसेनेला मानणारा वर्ग ही मोठा आहे त्यामुळे दोन्ही शिवसेने कडून काय भूमिका घेतली जाते, यावरच विजयाची गणित अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा -

  1. मोदींनी सिंचन घोटाळ्याचे आरोप कुणावर केले, शरद पवारांचा सवाल, अजित दादा प्रफुल पटेलांच्या दाव्यांचा घेतला समाचार
  2. अजित पवारांचे गौप्यस्फोट; शरद पवारांनी दिलं थेट उत्तर, म्हणाले 'मी पहिल्यांदाच ऐकलं'
  3. विचलित होऊ नका, संधीसाधूंना संधी देऊ नका - शरद पवारांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.