ETV Bharat / state

तेजस ठाकरेंनी लावला सापाच्या नव्या प्रजातीचा शोध, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2023, 6:26 PM IST

Sahyadriophis snake
Sahyadriophis snake

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. या सापाला 'सह्याद्रीओफिस' असे नाव देण्यात आले असून ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनची मान उंचावली आहे. ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनचे तेजस ठाकरेंसह संशोधक हर्षिल पटेल यांनी पश्चिम घाटात संशोधनादरम्यान सापाची ही नवीन प्रजाती शोधून काढली.

मुंबई : शिवसेना म्हटलं की डोळ्यांसमोर बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उभी राहते. राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटुंबाला महत्त्व आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून ठाकरे कुटुंबातील प्रत्येकजण राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मंत्रीपदही भूषावले आहे. मात्र, राजकारण बाजूला ठेवून ठाकरे घराण्यातील तेजस ठाकरे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेजस ठाकरे यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा नुकताच शोध लावला आहे.

सापावरील शोधनिबंध प्रसिद्ध : तेजस ठाकरे यांच्या टीमने पश्‍चिम घाटात संशोधन करताना नवीन सापाची प्रजाती शोधून काढली आहे. तसेच, सापडलेल्या या नवीन प्रजातीला 'सह्याद्रिओफिस' असे नाव देण्यात आले आहे. नॅशनल हिस्ट्री म्युझियम लंडन आणि जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये या सापाच्या प्रजातीवरील शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

11 हून अधिक दुर्मीळ प्रजातीचा शोध : तेजस ठाकरे सातत्याने अनेक जंगलांना भेटी देऊन निसर्गातील जैवविविधतेत नाविन्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही त्यांनी खेकडे, मासे, समुद्री ऑर्किड यांसारख्या 11 हून अधिक दुर्मीळ वन्य प्रजाती शोधून त्यांना नावे दिली आहेत. सिंधुदुर्गातील आंबोली येथील हिरण्यकेशी येथे सापडलेल्या आराध्य सुवर्ण 'देवाचा मासा'चे संवर्धन करण्यासाठी तेजस ठाकरे यांनीही संवर्धन मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमने पश्चिम घाटात सापाच्या आणखी एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे.

तेजसबरोबर हर्षल यांच्या टीमचे यश : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे ह्यांना राजकारणापेक्षा निसर्गात रमायला आवडतं. निसर्ग, पर्यावरण तसेच जीवसृष्टीचा अभ्यास तेजस ठाकरेंसह त्यांची टीम करत आहे. या आगोदर देखील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत माशांच्या चौथ्या नवीन प्रजातीचा शोध तेजश ठाकरेंनी लावला आहे. तेजस ठाकरे यांनी आंबोली घाटातील हिरण्यकेशी नदीत सोनेरी केस असलेल्या माशीची नवीन प्रजाती शोधून काढली होती. या माशीची ही 20 वी प्रजाती आहे. तसेच तेजस ठाकरे यांनी शोधलेली ही चौथी प्रजाती आहे. याआधी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत दुर्मीळ पालीचा शोध लावला होता.

का ठेवण्यात आले 'सह्याद्रिओफिस' नाव : या सापाला 'सह्याद्रिओफिस' असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये संस्कृत शब्द सह्याद्री आणि ग्रीक शब्दांचे एकत्रीकरण करून या सापाचे नाव ठेवण्यात आले आहे. ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनच्या या शोधामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेची नवीन माहिती संशोधकांसह विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा -

  1. तेजस ठाकरे यांनी शोधली गोड्या पाण्यातील द्विरंगी खेकड्याची नवी प्रजाती Bicolor crab of Ghatiana species found
  2. तेजस ठाकरे अन् सहकाऱ्यांनी शोधली पालीची दुर्मिळ प्रजात
  3. पूरग्रस्त भागात २ नव्या प्रजातींचा शोध; शोधात तेजस ठाकरेंचा समावेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.