ETV Bharat / state

खुशखबर! मान्सून केरळमध्ये दाखल

author img

By

Published : Jun 3, 2021, 4:44 PM IST

आज केरळमध्ये मान्सून दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

खुशखबर! मान्सून केरळमध्ये दाखल
खुशखबर! मान्सून केरळमध्ये दाखल

मुंबई - शहरातील तापमान वाढल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. यामुळे मान्सून कधी दाखल याची सर्वाना प्रतिक्षा आहे. या सर्वांसाठी खुशखबर म्हणजे आज केरळमध्ये मान्सून दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये या चार महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणासह मुंबईत दाखल होईल
सर्वात पहिला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर महाराष्ट्र दाखल होतो. 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणासह मुंबईत दाखल होईल. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवेश होतो. केरळमध्ये सर्वप्रथम मान्सूनचं आगमन होतं. केरळमध्ये दरवर्षी १२० दिवसांच्या पावसाळ्यामध्ये सरासरी २०४.९ सेंटिमीटर मान्सूनची नोंद व्हायची. पण गेल्या वर्षी केरळमध्ये सरासरीच्या तब्बल ९ सेंटिमीटर अधिक म्हणजेच २२२.७९ सेंटिमीटर इतका पाऊस पडला.

यंदा मान्सून दोन दिवस उशिरा
भारतीय हवामान विभागाने एक जूनला मान्सून केरळात दाखल होईल, असे सांगितले होते. मात्र मान्सून दोन दिवस उशिरा केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सून दक्षिण अरबी समूद्र, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन मालदिव भागात सक्रिय झाल्याचं सांगितलं आहे.

स्कायमेटच्या दाव्याने निर्माण झाला होता संभ्रम
केरळमध्ये मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यानंतर स्कायमेट वेदरने मान्सून केरळात दाखल झाल्याचं म्हटलं होत. खासगी हवामान संस्थेकडून केरळात मान्सून 30 मे रोजी दाखल झाल्याचे म्हटल्यानं सामान्य माणूस गोंधळात पडला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.