ETV Bharat / state

महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचं सरकार तयार झालंय; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 2:37 PM IST

Sanjay Raut on mahananda : अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी 3 वाजता आझाद मैदान आंदोलन स्थळी भेट देणार आहेत. अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

Sanjay Raut
संजय राऊत

संजय राऊत

मुंबई : Sanjay Raut on mahananda राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला वळवले जात आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, हिरे व्यापारपासून सुरू झालेले हे सत्र अद्यापही सुरुच आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणारी पाणबुडी पर्यटन सेवादेखील गुजरातला वळवण्यात आल्याची चर्चा ताजी आहे. आता राज्यातील महानंदा दूध डेअरी गुजरातला स्थलांतरित करण्याच्या विचारात सरकार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तोच दुसरीकडं मुंबईतील आझाद मैदानवर राज्यभरातील सर्व अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर बसले आहेत. साधारण एक लाख अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानात दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांची आज दुपारी उद्धव ठाकरे भेट घेणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय.

महाराष्ट्राची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न : खासदार संजय राऊत म्हणाले, महानंदा डेअरी प्रकल्पाच्या रुपानं गुजरातच्या शिरपेचात आणखी एक उद्योग रोवण्याचा प्रयत्न आहे. महत्त्वाचे उद्योग गुजरातला देण्याचा या सरकारचा डाव आज उघड झालाय. महाराष्ट्रात अनेक दुधाचे ब्रँड आहेत. ग्रामीण भागात दूध उत्पादन, दूध डेअरी याचं फार मोठं जाळं आहे. त्यासाठी राज्यात अमूलच पाहिजे असं नाही. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला. त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटक सरकारची निवडणूक लढवली गेली. 'महानंदा' ही महाराष्ट्राची ओळख आहे. ती ओळख पुसून टाकली जात आहे. यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार घोटाळा दिसून येत नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारलाय. रोज एक एक व्यवसाय खेचून गुजरातमध्ये नेलं जातंय. यावर हे गद्दार तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हे कसले महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहेत? दुग्ध व्यवसायाची सहकारी चळवळ, प्रत्येक गोष्ट तुम्ही घेऊन जात आहात. तुम्ही सगळे दिल्लीच्या ताटाखालचं मांजर आहात. महाराष्ट्रात धृतराष्ट्रांचं सरकार तयार झालंय, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी सरकरावर केलीय. तसंच जर 'महानंदा' नेण्याचा प्रकार झाला तर शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा आहे- मुंबईच्या आझाद मैदानवर राज्यभरातील सर्व अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर बसले आहेत. साधारण एक लाख अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानात दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांची आज दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे भेट घेणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाखांपेक्षा जास्त कर्मचारी शिक्षक हे आझाद मैदानावर येत आहेत. त्यांच्या मागण्या वर्षानुवर्षे जुन्या आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला, पण कोविडमुळं त्यात फार काही करता आलं नाही. आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संबोधित करणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अदानी ग्रुपला मोठा दिलासा, 'हा' दिला निर्णय
  2. छत्रपती संभाजीनगरमध्ये 'इसिस' समर्थकांची बैठक? अकरा जणांना युपी एटीएसनं बजावली नोटीस
  3. 'काकू'ला पकडण्यासाठी नदीत दगड मातीचं छोटं धरण, मेळघाटात आदिवासी महिलांची मासेमारीची अनोखी पद्धत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.