महाराष्ट्राच्या राजकारणातलं द्युत; राऊतांनी पोस्ट केला बावनकुळेंचा जुगार खेळतानाचा फोटो, आणखी २७ फोटोंसह ५ व्हिडिओ असल्याचा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणातलं द्युत; राऊतांनी पोस्ट केला बावनकुळेंचा जुगार खेळतानाचा फोटो, आणखी २७ फोटोंसह ५ व्हिडिओ असल्याचा दावा
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांना भाजपानं आदित्य ठाकरेंचा एक फोटो पोस्ट करून प्रत्युत्तर दिलं. काय आहे हे प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..
मुंबई Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : खासदार संजय राऊत यांच्या एका दाव्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदेशात कसिनोमध्ये जुगार खेळल्याचा दावा राऊतांनी केला. त्यांनी याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केलाय. मकाऊमधील हा फोटो असल्याचं सांगण्यात येतंय. हे प्रकरण गंभीर असून, सीबीआयनं यांची चौकशी करावी अशी मागणी आता संजय राऊतांनी केली.
काय म्हणाले संजय राऊत : संजय राऊत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक फोटो पोस्ट करत म्हणाले, "१९ नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ, veneshine. साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?". या प्रकरणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली. राऊत यांनी दावा केला की, त्यांच्याकडे आणखी २७ फोटो तसंच ५ व्हिडिओ आहेत. ते जर बाहेर काढले तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आमच्याकडे भान, माणुसकी तसंच बाळासाहेबांचे संस्कार आहेत, म्हणूनच आपण जास्त काही बोलत नाही, असं राऊत म्हणाले.
-
महाराष्ट्र पेटलेला आहे...
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत.
फोटो zoom करुन पहा...ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है...@BJP4Maharashtra @AmitShah @AUThackeray @Dev_Fadnavis pic.twitter.com/cfhswYn7Zx
भाजपाचं प्रत्युत्तर : संजय राऊत यांच्या या टीकेला भाजपानं प्रत्युत्तर दिलं. "चंद्रशेखर बावनकुळे कधीच जुगार खेळलेले नाहीत", असं महाराष्ट्र भाजपानं म्हटलंय. भाजपानं राऊतांना उत्तर देताना आदित्य ठाकरेंचा एका पार्टीतील फोटो पोस्ट केला. "आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की आहे", असा प्रश्न भाजपानं उपस्थित केलाय. "आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधीही जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते हा तेथील परिसर आहे. ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही", अशी टीका पक्षानं संजय राऊतांवर केली.
-
आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 20, 2023
ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर.
असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ @rautsanjay61 , आदित्य… pic.twitter.com/TGCTOeNpYx
राऊतांची मानसिक स्थिती बिघडली : संजय राऊतांच्या या पोस्टनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. "संजय राऊत यांनी राजकारण सोडून वैयक्तिक जीवनात कोण कुठे येतंय, जातंय यासाठी एक डिटेक्टीव्ह एजन्सी सुरु करावी", असं ते म्हणाले. "बावनकुळे आपल्या कुटुंबासोबत दिवाळीत सुट्टीवर गेले होते. त्यांचे फोटो पोस्ट करुन संजय राऊतांनी खालच्या पातळीचं राजकारण गाठले आहे. राऊतांकडे माझे २५ लाख रुपये आहेत. ते त्यांनी आतापर्यंत दिलेले नाहीत. आता या पैशातून त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावा", असा सल्ला मोहीत कंबोज यांनी दिला.
वैयक्तिक जीवनात डोकावणं चुकीचं : राज्याचं राजकारण एवढं खालच्या पातळीवर गेलं आहे की, राजकीय भूमिका न घेता, वैयक्तिक पातळीवर टीका होतेय. त्यामुळे राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. यामुळे राज्यातील मूळ प्रश्न बाजूला राहितील आणि राजकीय नेते वैयक्तिक उणीधुणी काढतील. कोणाच्याही वैयक्तिक जीवनात डोकावणं चुकीचं आहे, असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं.
राज्याच्या राजकारणाची पातळी घसरली : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांची वक्तव्ये ही अलिकडच्या काळात खालच्या पातळीवर गेली आहेत. अत्यंत सुसंस्कृत राजकारणी म्हणून महाराष्ट्राची देशाच्या राजकारणात ओळख आहे. मग तो शरद पवारांचा वाढदिवस असो की मनोहर जोशींचा त्यांच्या कार्यक्रमांना सर्वच पक्षांचे सरसकट सगळेच नेते उपस्थित असतात. एकमेकांशी संवाद साधतात. मात्र अलिकडच्या काळातील वक्तव्ये आणि आरोप प्रत्यारोप पाहता ही पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे, असंच यावरुन दिसून येतंय.
हेही वाचा :
