Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अन् वादग्रस्त वक्तव्य; वाचा सविस्तर

author img

By

Published : Jan 23, 2023, 5:15 PM IST

Updated : Feb 12, 2023, 5:31 PM IST

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari ()

कायम काहीतरी वादावरून चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अखेर राजपाल पदावरून मुक्त होण्याचा अर्ज राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. आपल्याला राज्यपाल पदावरून मुक्त करा अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांच्याकडे केली होती. आता महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादात सापडलेत आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेतही असतात. त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्रात अनेकदा राजकीय नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केलेली आहे. तर, बऱ्याचवेळा त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात जोरदार आंदोलनं झालेली आहेत. यामध्ये राज्यपालांनी आपल्या पदाची गरीमा राखावी यापासून ते भाजपचे प्रवक्ते म्हणून बोलतात असा आहोपही त्यांच्यावर अनेकदा झाला आहे. हे सगळे असताना त्यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करा अशीही जोरदारपणे मागणी झालेली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांचा राजपाल पदावरून मुक्त होण्याचा अर्ज राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.आता महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती झाली आहे.

राज्यपालांनी कधी आणि कुठे वादग्रस्त वक्तव्य केली याची ही मालिका

1) 'गुजराती-राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही' : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (29 जुलै 2022)रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली. या चौकाचे नामकरण दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी चौक असे करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही,' असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. या वक्तव्यानंतर वाद झाल्यानंतर स्पष्टीकरणात 'मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानीही आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला अस ते म्हणले. तसेच, काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले असही ते म्हणाले होते.

2) 'समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?' : समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी काही दिवसांपूर्वी अडचणीत आले होते. चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचे आपल्या समाजात मोठे स्थान असते. तसेच, छत्रपतींनी मला माझे राज्य तुमच्या कृपेने मिळाले आहे, असे समर्थांना म्हटले, अशा आशयाचे वक्तव्य कोश्यारींनी केले. पण नंतर या वादावर स्पष्टीकरणही त्यांनी दिले होते. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले, या राज्याची चावी मी तुम्हाला देतो. त्यावर समर्थ म्हणाले, ही राज्याची चावी मला कुठे देता, तुम्हीच याचे ट्रस्टी आहात, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपलं विधान प्राथमिक माहितीच्या आधारे होते. आता त्यासंबंधी नवीन निष्कर्ष समजल्याचे आणि तोच पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली होती.

3) महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वादग्रस्त विधान : भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत हसत हसत केलेल्या एका वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. यावर कोश्यारी म्हणाले, कल्पना करा की सावित्री बाईंचे लग्न 10 व्या वर्षी झाले, तेव्हा त्यांच्या पतिचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुलं वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असे वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्याबाबत कोश्यारींनी हे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

4) नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे भारत कमकुवत : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. पंडित नेहरूंबद्दल बोलताना कोश्यारी म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांचीही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असे त्यांना नेहमी वाटायचे. देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. पण त्यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ पुढे सुरू होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींचे सरकार वगळता आधीचे सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हते, असे वक्तव्यही कोश्यारी यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.

5) 'शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत' : काही दिवसांपुर्वीचा ताजा वाद म्हणजे, कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य. कोश्यारी हे (19 नोव्हेंबर 2022)रोजी औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सहभागी झाले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आले. या दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केले होते. ते म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे, ते त्या त्या व्यक्तींचे नाव घ्यायचे. मला असे वाटते की जर कुणी तुम्हाला विचारले की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलनं आणि काही ठिकाणी बंद पुकारण्यात आले होते.

अखेर विनंती केली : ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यांची एक मालिका. हे इतकेच नाही तर राज्यपाल म्हणून कारकीर्दीमुळेही राज्यपाल मोठ्या प्रमाणता वादात सापडले आहेत. कारण राजभवनात बसून ‘समांतर सरकार’ चालवत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोश्यारींवर सातत्याने झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा होते तेव्हा राज्यपाल हे भाजपचे प्रवक्ते आहेत असा सातत्याने आरोप होत होता. इतकेच नाही तर कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची पुर्ण गरीमा घालवली असाही आरोप त्यांच्यावर झाला आहे. अखेर, आज राज्यपालांनी आपल्याला राज्यपाल पादावरून मुक्त करावे अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ट्विटच्या माधमातून केली आहे. आता राज्यपालांची विनंती पंतप्रधान मान्य करतात की राज्यपाल पुढेही कायम राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती, जाणून घ्या त्यांच्याविषयी

Last Updated :Feb 12, 2023, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.