Railway Employee Protest On CSMT : जुनी पेन्शन बंद केल्याने कर्मचारी आक्रमक: ट्रेन बंद करण्याचा रेल्वे कर्मचारी संघटनेचा इशारा
Published: Jan 12, 2023, 8:02 PM


Railway Employee Protest On CSMT : जुनी पेन्शन बंद केल्याने कर्मचारी आक्रमक: ट्रेन बंद करण्याचा रेल्वे कर्मचारी संघटनेचा इशारा
Published: Jan 12, 2023, 8:02 PM
केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करुन नवी योजना लागू केली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कर्मचारी संघटनेने निदर्शने केली आहेत. वेळ पडल्यास रेल्वे बंद करण्याचा इशाराही रेल्वे संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
मुंबई - रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी असलेली जुनी पेन्शन योजने केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या पेन्शन योजनेऐवजी कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना सरकारने सुरू केली आहे. त्याविरोधात आज रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीआरएमएस, एनएफआयआर या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे निदर्शने केले. आगामी 3 महिन्यात याबाबतच्या आंदोलनाचा निर्णय घेऊन वेळ पडल्यास ट्रेन बंद करण्याचा इशारा सीआरएमएस संघटनेचे अध्यक्ष आर पी भटनागर यांनी दिला आहे.
सेवानिवृत्त जीवन अंधकारमय होणार केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे. त्या विरोधात आज मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे इंटक या कामगार संघटनेशी संलग्न असलेल्या सीआरएमएस, एनएफआयआर संघटनेच्या रेल्वे कर्मचारी अधिकाऱ्यांनी अध्यक्ष आर पी भटनागर तसेच जनरल सेक्रेटरी डॉ. प्रवीणचंद्र वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी भटनागर बोलत होते. यावेळी बोलताना एनपीएस ही नॅशनल पेंशन स्किम नसून नो पेंशन स्कीम आहे. १ जानेवारी २००४ नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर ही योजना थोपवून त्यांची वृद्धापकाळातील काठी सरकारने काढून घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे सेवानिवृत्त जीवन अंधकारमय होणार असल्याचे भटनागर म्हणाले.
वेळ प्रसंगी रेल्वे सेवा बंद करू केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना लागू करून आपल्या जबाबदारीमधून हात झटकला आहे. जुन्या पेंशन स्कीममधील पैसे सरकारच्या तिजोरीतून दिले जात होते. नवीन योजना शेअर मार्केटवर आधारित असल्याने या योजनेचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही. याचा एनएफआयआर आणि सीआरएमएस संघटना विरोध करत आहे. जोपर्यंत नवीन पेन्शन योजना रद्द केली जात नाही तोपर्यंत आमचा संघर्ष यापुढेही सुरु राहील. येत्या दोन ते महिन्यात यावर निर्णय झाला नाही तर आमचा संघर्ष तीव्र करू, वेळ प्रसंगी रेल्वे सेवा बंद करू, असा इशारा भटनागर यांनी दिला आहे.
निर्णायक संघर्ष करू नवीन पेन्शन योजनेत ग्रॅच्युइटी आणि फॅमिली पेन्शन दिली जाणार आहे. रेल्वेचे कर्मचारी दिवस रात्र काम करतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही मौसमात ते काम करतात. सैनिकासारखे काम करून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवतात. ट्रॅकवर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मग सेनेमध्ये काम करणाऱ्या सैनिकांप्रमाणे तसेच खासदार आणि आमदार यांच्याप्रमाणे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का लागू नाही, असा प्रश्न त्यांनी केला. आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी निर्णायक संघर्ष करू, असा इशाराही भटनागर यांनी दिला आहे.
