ETV Bharat / state

Ajit Pawar News : अजित पवारांचे राष्ट्रवादीत बंड? जाणून घ्या, राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

author img

By

Published : Apr 18, 2023, 11:24 AM IST

Updated : Apr 18, 2023, 1:07 PM IST

महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या पात्रतेचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. हे प्रकरण आणि त्याचा निकाल शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात लागण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. न्यायालयाचा निकाल शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास महाराष्ट्रात सध्या अस्तित्व असलेले शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची शक्यता आहे. भविष्यातील हीच शक्यता लक्षात घेता सध्या अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पहाटेच्या शपथविधी घेतला होता. या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केलं

Ajit Pawar News
अजित पवार बातमी

मुंबई- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ४० आमदारांचे पाठिंबा देणारे पत्र असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या वृत्तानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी अजित पवारांबद्दलच्या वावड्या असल्याचे म्हटले आहे. अजित पवारांची शरद पवारांवर श्रद्धा आहे. ते कोठेही जाणार नाहीत, असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.


यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अर्थातच शिवसेना हे मजबूत आहेत. आम्ही आजही एकमेकांसोबत आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी खिळखिळी झाल्याच्या वावड्या उठवला जात आहेत. त्यांना या वावड्या उडवू द्या. ही भरती बिनपगारी असते. अलीकडे कॉन्ट्रॅक्ट लेबरची भरती खूप असते. ज्यांना कॉन्ट्रॅक्ट लेबर घ्यायचा आहे त्यांनी घ्यावे. त्यांची वॉशिंग मशीन पुन्हा रिपेअर करायची वेळ आली आहे. आता यांनाच सगळ्यांना त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकायची वेळ आली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष या तिघांची आघाडी मजबूत आहे. या मजबूत आघाडीची भीती भारतीय जनता पक्षाला वाटते. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. म्हणून 2024 पर्यंत ही आघाडी खिळखिळी करण्याचे त्यांचे कारस्थान जरूर आहे. शिवसेनेचे आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का? वीस पंचवीस आमदार जाणे म्हणजे पक्ष खिळखिळा होणे असे होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु तो फुटला का?"



मुख्यमंत्र्यांच्या पोटात गोळा आला असेल- महाविकास आघाडीत फूट पडणार किंवा नाराजी अशा बातम्या येत राहतात. अशा बातम्या येणे म्हणजे अंतिम सत्य नाही. माझी पक्की माहिती आहे, ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत अजित दादांविषयी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विषयी माझ्या माहितीप्रमाणे त्या खोट्या आहेत. भाजप या वावड्या उठवित आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. परंतु त्याचा काहीही फायदा होणार नाही. भारतीय जनता पक्ष आपापसात मतभेद करण्याचा प्रयत्न करत आहे. या बातम्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पोटात गोळा आला असेल, असा टोला राऊत यांनी लगावला.


16 आमदार अपात्र ठरतील- महाविकास आघाडीच्या एकीवर या वावड्यांचा काही परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आज सकाळीच आमचे बोलणे झाले आहे. महाविकास आघाडी हे मजबूत गटबंधन 145 विधानसभेच्या जागा जिंकणार तुम्ही कितीही आमदार खासदार फोडा परंतु महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी आहे. लोकांच्या मनात चिड आणि संताप आहे. याचा धसका भाजपाने घेतला आहे. मला खात्री आहे की हे 16 आमदार अपात्र ठरतील. अजूनही या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये राम शास्त्री आहेत. म्हणून आम्हाला खात्री आहे निकाल आणि न्याय याच्यामध्ये फरक आहे. आम्हाला न्याय मिळेल.


आम्ही सगळे शरद पवार यांना नेता मानतो- पुढे बोलताना खासदार राऊत म्हणाले की, शरद पवार हे आता बारामतीत आहेत. आज रात्री उशिरा ते मुंबईत पोहोचतील. उद्या किंवा परवा आम्ही त्यांना भेटू. अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे संपर्कात होते. पूर्णवेळ नागपुरात असताना एकत्र होते. चांगला संवाद झाला. उगाच वावड्या उठवू नका. आम्ही सगळे शरद पवार यांना नेता मानतो. अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे अगदी स्नेहाचे संबंध आहेत. उगाच या वावड्या उठवू नका. भविष्यात काय होत आहे ते पहा.

दोन भूकंप होणार - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, की सर्व नेते एक विचाराने काम करत आहेत. अजित पवार यांच्याशी संबंधित चर्चांमध्ये तथ्य नाही. तुमच्या मनातील चर्चा आमच्या मनात नाहीत. मुंबईत राष्ट्रवादीने कोठलीही बैठक बोलाविली नाही. पक्षफुटीच्या बातम्या अफवा असल्याचेही शरद पवारांनी स्पष्ट केले. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात एक आणि दिल्लीत एक असे दोन भूकंप होणार असल्याचे माध्यमांना बोलताना म्हटले आहे. शिंदे फडणवीस सरकारमधील शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार आदी मंत्र्यांनी अजित पवार भाजपमध्ये आले तर सरकारची ताकद वाढणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी मी कुणालाही उत्तर द्यायला बांधील नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष म्हणेल त्याप्रमाणे करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासह काही राष्ट्रवादीचे आमदार नॉट रिचेबल आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या एकी विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. मला एकट्यानेच भाजपशी लढावे लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्याशी बोलताना वक्तव्य केल्याचे सूत्राने म्हटले आहे.

आमचा राष्ट्रवादी पक्ष एकसंध अजित पवार यांच्या पक्ष परिवर्तनाच्या चर्चेबाबत राष्ट्रवादीचे आमदार माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षश्रेष्ठी,पक्षाचे ज्येष्ठ नेते, शरदचंद्र पवार आणि अजित हे ठरवतात त्याचप्रमाणे पक्षाचे काम चालत असते. त्याच प्रमाणे आम्ही काम करत असतो. त्यामुळे आमचा राष्ट्रवादी पक्ष एकसंध आहे. त्याबाबत कुठलीही शंका नसल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. तुम्ही जाणार का.?अस विचारले असता त्यांनी त्यावर बोलण टाळले.

खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे- दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे हे डोकावून पाहण्याच काम काँग्रेस कधी करत नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार हे भाजपमध्ये जाणार का या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले. दुसऱ्यांची घर फोडून स्वतःचे घर सजवू नये असा सल्लाही नाना पटोले यांनी भाजपला दिला. अजित पवार महाविकास आघाडीत राहणार असल्याचेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. मी भाजपची खासदारकी 2017 मध्ये सोडून आलेलो आहो. मला माहित आहे ते कसे लोक आहेत. भाजप लोकतांत्रिक व्यवस्थेच्या विरोधातील पक्ष आहे. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

हेही वाचा- Ajit Pawar News : राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या ४० समर्थकांचे पत्र सह्यानिशी तयार?

Last Updated : Apr 18, 2023, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.