ETV Bharat / state

पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम होणार सुरू, 'या' विद्यापीठाकडे जबाबदारी

author img

By

Published : Sep 15, 2021, 10:34 PM IST

राज्य शासनाने पैठण येथील संतपीठाचे अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शैक्षणिक व्यवस्थापनाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

paithan sant peeth courses will begin soon by dr babasaheb ambedkar marathwada university
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम होणार सुरू, 'या' विद्यापीठाकडे जबाबदारी

मुंबई - पैठण येथील संतपीठाचे अभ्यासक्रम लवकरच सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या शैक्षणिक व्यवस्थापनाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्यात आली असून यासंदर्भातील शासन निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला गती येणार आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ मध्ये आढावा घेतला होता. पैठण येथील संतपीठाच्या अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, किर्तन, प्रवचन, तत्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे देण्याचा निर्णय आज बुधवारी घेण्यात आला. ५ वर्षांसाठी किंवा पुढील आदेश होईलपर्यंत हे काम संबंधित विद्यापीठाकडे सोपवण्यात आले असून यासाठी अटी-शर्ती घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

या अटी-शर्तीच्या धर्तीवर मान्यता
विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना आवश्यक त्या प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल. निरनिराळ्या संप्रदायांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास घटकांची निवड करून अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येईल. संतपीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक संप्रदायाच्या अभ्यासक्रमांना योग्य ते स्थान देण्यात येणार असून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम चालवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्तींची मानधन किंवा तासिका तत्वावर तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपात बाह्य स्त्रोतामार्फत करता येऊ शकेल. यासाठीचा खर्च विद्यापीठाला स्व निधीतून करावा लागणार असून संतपीठाच्या जागेची तसेच इमारतीची मालकी शासनाकडेच राहील. फक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी ही इमारत विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे.

दोन वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण
मराठवाडा विकासाच्या ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे संतपीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. या संतपीठाची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० नुसार करण्यात आली असून यासाठी ज्ञानेश्वर उद्यानानजीकची १७.८ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. संतपीठाच्या प्रशासकीय इमारत, वसतीगृह आणि वाचनालय इमारत बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार संतपीठाची प्रशासकीय इमारत, दोन वसतीगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सुरूवातीला सांस्कृतिक कार्य विभागाकडे असलेला हा विषय नंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला होता.

हेही वाचा - राज कुंद्रा प्रकरण : गुन्हे शाखेने दीड हजार पानांचे पुरवणी दोषारोपपत्र केले न्यायालयात सादर

हेही वाचा - राणीच्या बागेत पेंग्विनच्या दुसऱ्या पिढीचा जन्म; महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.