ETV Bharat / state

खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळं राज्य उद्ध्वस्त, आदित्य ठाकरेचं जनतेला खुलं पत्र

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 8:24 PM IST

शिंदे सरकारच्या भ्रष्टाचारामुळं आमची शहरं, राज्य उद्धवस्त झाल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलीय. याबाबत त्यांनी महाराष्ट्रवासीयांना पत्र लिहित, शिंदे सरकारवर निशाणा साधलाय.

Aaditya Thackeray open letter
आदित्य ठाकरेचं महाराष्ट्रवासीयांना खुलं पत्र

मुंबई : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (ठाकरे गट) यांनी राज्यातील जनतेला खुलं पत्र लिहिलं आहे. आमदाराच्या मुलानं एका व्यावसायिकाचं अपहरण केलं, पण त्याच्यावर कारवाई होत नाही. सणासुदीत बंदुकीचा धाक दाखवणाऱ्याला अध्यक्ष बनवलं जातं. तुम्ही हा हिंदू धर्म स्वीकारणार आहात का? असा सवाल आता आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गद्दारांच्या टोळीमुळं शहरांची, राज्याची अवस्था बिकट झाली आहे. खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळं शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. शहरे लुटली जात आहेत, गावांना मदत मिळत नाही, असं आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय.

माझ्या प्रिय महाराष्ट्रवासीयांनो,

हे आपलं वर्ष आहे! आपण हे वर्ष फक्त आपल्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी समर्पित करायला हवं! भारताच्या लोकशाही मूल्यांचं आणि संविधानाचं कायदेशीर बाबींचाच वापर करून खच्चीकरण केलं जाताना दिसत आहे. जगभरात जिथे जिथे लोकशाही संपुष्टात आली, तिथे ती संपवण्यासाठी अशा संस्थांचा वापर केला गेला होता. ज्या खरंतर लोकशाहीच्या रक्षणासाठी अस्तित्वात आल्या होत्या. लोकशाही संपवून हुकूमशाही निर्माण झालेल्या ठिकाणी आजपर्यंत सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेलं नाही. जे काही केलं गेलं ते केवळ काही मोजक्या लोकांसाठी, तुमच्या-माझ्या सारख्या 1.3 अब्ज लोकांसाठी तर नक्कीच नाही!

आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर, पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणं हेच आपलं ध्येय आहे. 2022 च्या मध्यात गद्दारांच्या टोळीनं आपल्या या शांतीप्रिय आणि प्रगतशील महाराष्ट्राचं रूपांतर ‘बिल्डर्स आणि कंत्राटदार’ मिळून चालवत असलेल्याला एका बेकायदेशीर राजवटीत केलं. आता, खोके सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळं आपली शहरं उद्ध्वस्त होत आहेत. रस्ते, विकास योजनांमध्ये घोटाळे होत आहेत. उद्यानं गिळंकृत केली जात आहेत. इतकंच नाही तर, रस्त्यावरील फर्निचर, सॅनिटरी पॅड्स ह्यांच्या बाबतीतही घोटाळे होत आहेत. हे तर केवळ भ्रष्ट कारभाराचं वरवरचं टोक आहे. ग्रामीण भागातल्या अडचणी तर टोकाच्या भीषण होत आहेत. शेतकरी आत्महत्या वाढतच चालल्या आहेत. सततच्या हवामान बदलाला आणि त्यामुळे आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना मूलभूत नुकसान भरपाईचीही मदत केली जात नाही. त्यांना धीर द्यायला देखील सरकारकडून कोणीही जात नाही. खोके सरकार फक्त बॅनर्सवर दिसतं, हे खरोखरच भयावह आहे!

एकीकडे शहरं लुटली जात आहेत, दुसरीकडं ग्रामीण भागाला कुठलीच मदत मिळत नाहीये. गुन्हेगार मात्र मोकाट सुटले आहेत. एका आमदाराचा मुलगा एका व्यावसायिकाचं अपहरण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला. परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. आणखी एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखताना कॅमेऱ्यात पकडला गेला. त्यानंतर त्यानं पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची बातमीही आपण ऐकली. पण त्याच आमदाराला त्याच्या ह्या उद्दामपणाचं कौतुक म्हणून, आता सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. एका हिंदू सणात, बंदूकीचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं जातं? हे हिंदुत्व तुम्ही-आम्ही, आपण स्वीकारणार आहोत का? काही कॅबिनेट मंत्र्यांनी महिला खासदारांना शिवीगाळ केली, काही आमदार फोनवर अधिकाऱ्याला धमकावताना रेकॉर्ड झाले आहेत. परंतु ह्या सर्व कृत्यांसाठी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली आहे.

मागच्या 2 वर्षात, आपल्या राज्यात 2 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकणारे उद्योग, राजवटीच्या लाडक्या राज्यात पळवले गेले. नैसर्गिकरित्या त्यांनी नक्कीच महाराष्ट्राची निवड केली असती, पण त्यांना जबरदस्तीने दूर नेले गेले. देशभरातून अनेक लोक उदरनिर्वाहाची स्वप्नं घेऊन आपल्या राज्यात येतात. पण आपल्या राज्याला आणि ह्या लोकांना मात्र ह्या स्वप्नापासून दूर नेलं जात आहे. प्रदूषण, भ्रष्टाचार, गलथान कारभार, ढासळत चाललेल्या पायाभूत सुविधा, सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा अभाव, महाराष्ट्रातील राष्ट्रीय, राज्य महामार्गांची भीषण अवस्था ह्यांसारख्या अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत. एम.टी.एच.एल, दिघा रेल्वे स्थानकासारख्या पायाभूत सुविधा अनेक महिन्यांपासून उ‌द्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. ह्या सर्व मूळ समस्या लपवण्यासाठी, आत्ताच्या राजवटीनं आपल्याला सततच्या धार्मिक/ जातीय दंगली, नागरी अशांतता टीव्ही वादविवादांमध्ये व्यस्त ठेवलं आहे. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इतर समस्यांकडून लक्ष वळवण्यासाठी आपल्याला जाणून बुजून कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवलं जातंय, मूळ मुद्द्यांपासून भरकटवलं जातंय!

आता आपण ठरवायला हवं, की आपल्याला आपल्या राज्यासाठी, शहरासाठी, आपल्या शेतीसाठी, आपल्या परिसरासाठी, आपल्या स्वतःसाठी काय हवंय? मी हे नेहमीच सांगत आलोय, 'जी माणसं वर्तमान, भविष्याचा विकास करण्यासाठी काहीच करू शकत नाहीत. ती भूतकाळातल्या वादात आपल्याला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. 'सत्य हे आहे की, आपल्या भूतकाळाबद्दलच्या भांडणावर त्यांचं 'भविष्य' अवलंबून आहे. पण आपलं भविष्य, आपण आपल्या उद्यासाठी काय करणार आहोत, ह्यावर अवलंबून आहे. ज्यांनी लोभापायी स्वतःला विकलं, जे उद्या आपलं भविष्य विकायलाही मागेपुढे बघणार नाही, अशा गद्दारांच्या राजवटीत तुमच्या मुलांची प्रगती, तुमची प्रगती होईल, असं तुम्हाला खरंच वाटतं का?

महाराष्ट्राचा अभिमान, वैभव लुटण्याचा प्रयत्न ही 'महाराष्ट्रविरोधी राजवट' करत आहे. अशा राजवटीत तुमचं उज्ज्वल भविष्य घडू शकेल, असं तुम्हाला वाटतं का? त्याहून महत्वाचं म्हणजे, लोकशाही व्यवस्थेवर चालणारं राज्य म्हणून नावाजलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात, हे आता लोकशाही असल्याचं ढोंगही करत नाहीत. अशा राजवटीत तुम्ही रहायला तयार आहात का? हे वर्ष आपल्यासाठी केवळ विचार करायचं नाही, तर कृती करण्याचं वर्ष आहे. ही कृती म्हणजे तुमचं 'मत', तुमचं भविष्य, आपलं भविष्य आहे, हे भारताबद्दल आहे. महाराष्ट्राबद्दल आहे. हे महान राष्ट्राच्या नागरिकांबद्दल आहे. तुमचं आजचं मत तुमच्या भविष्यासाठी मौल्यवान आहे. सत्याच्या न्यायाच्या बाजूनं लढणाऱ्यांना ह्या हुकूमशाहीत त्रास दिला जाईल. अडचणीत आणलं जाईल, पण हा लढा जर आपण मिळून लढलो, तर अंतिम विजय सत्याचाच आहे.

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! वंदे मातरम !

आपला,

आदित्य रश्मी उद्धव ठाकरे

हेही वाचा -

  1. खोके सरकारला अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी काही नाही - उद्धव ठाकरे
  2. पीएपी घोटाळ्यात पवार कुटुंबीयांचा सहभाग; किरीट सोमैया यांचा गंभीर आरोप
  3. बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून 400 ग्राहकांची 1 कोटींची फसवणूक, संचालकाला अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.