मुंबई पालिकेचे पेंग्विन प्रेम... 3 वर्षांत 36 कोटी खर्च, आणखी 15 कोटी खर्चाची तरतुद

author img

By

Published : Sep 5, 2021, 9:00 PM IST

Updated : Sep 6, 2021, 3:11 PM IST

c
c ()

एकीकडे कोरोना, टाळेबंदीमुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले असताना पेंग्विनवर पुढील तीन वर्षासाठी 15 कोटींचा खर्च केला जाणार आहे, तशी निविदा पालिकेने काढण्यात आली आहे. हा कोट्यवधीचा खर्च का केला जात आहे, असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई - एकीकडे कोरोना, टाळेबंदीमुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले असताना पेंग्विनवर पुढील तीन वर्षासाठी 15 कोटींचा खर्च केला जाणार आहे, तशी निविदा पालिकेने काढण्यात आली आहे. हा कोट्यवधीचा खर्च का केला जात आहे, असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. तसेच काढण्यात आलेली निविदा रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर खर्चाबाबत नक्की तोडगा काढला जाईल. मात्र, पेंग्विनबाबत तडजोड केली जाणार नाही, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

पेंग्विनवर 3 वर्षांत 15 कोटींचा खर्च, निविदा रद्द करण्याची विरोधी पक्ष नेत्यांची मागणी

पेंग्विनवर कोट्यवधीचा खर्च

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेत 2017 मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे. पेंग्विन खरेदीसाठी आणि या कक्षासाठी एकूण 25 कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर 3 वर्षांच्या देखभालीसाठी 11 कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी 15 कोटी खर्च अपेक्षीत आहे. निवीदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकुलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल. पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत. दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य, विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लीमेंटस् दिल्या जातात. गेल्या तीन वर्षात एक नवजात पिलू पेंग्विन आणि एका नर पेंग्विनचा मृत्यू झाला आहे.

टेंडर रद्द करा

पेंग्विन हे कंत्राटदारासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. कंत्राटदाराला फायदा व्हायला पाहिजे यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. राणीबागेतील आपले डॉक्टर आणि कर्मचारी परदेशातून आणल्या जाणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांना कसे सांभाळायचे आहे. हे गेल्या तीन वर्षांत शिकले आहेत. कोरोना काळात पालिकेची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. अशावेळी 15 कोटींचे टेंडर कशासाठी काढता, असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेले टेंडर रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. राणीबागेत संचालक आहेत त्या ठिकाणी परदेशातून संचालक मागवावेत, असा टोला रवी राजा यांनी लगावला आहे.

खर्चाबाबत तोडगा काढू

शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यानंतर एका पेंग्विनचा मृत्यू झाला त्यावेळीही राजकारण करण्यात आले. पेंग्विनमुळे पालिकेचे उत्पन्न वाढत असून खर्चही वाढत आहे. पेंग्विनमुळे मुंबईची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पेंग्विनवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो, असे विरोधकांना वाटत असेल तर त्यावर नक्की तोडगा काढला जाईल. मात्र, पेंग्विनवर तडजोड होणार नाही, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

सुधारीत निविदा काय आहे..?

पुढील 3 वर्षांसाठी पालिका 15 कोटी रुपये एकूण 7 पेंग्विनवर खर्च केला जाणार आहे. त्यासाठी पालिकेने 15 कोटींची सुधारित निविदा काढली असून प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार. 2018 मध्ये तीन वर्षांचा देखभालीचा करार हा 11 कोटीचा करण्यात आला होता. तो आता संपत आहे.

पेंग्विन्सच्या आलिशान लाईफस्टाईलवर कोट्यवधींचा खर्च

  • एका दिवसाचा एका पेंग्विनवरचा खर्च - 20 हजार
  • एका दिवसाचा 7 पेंग्विनवरचा मिळून खर्च - दीड लाख
  • एका महिन्याचा एका पेंग्विनसाठी खर्च - 6 लाख
  • एका महिन्याचा 7 पेंग्विनचा खर्च - 42 लाख
  • एका वर्षाचा एका पेंग्विनसाठीचा खर्च - 71लाख
  • एका वर्षाचा 7 पेंग्विनवरचा खर्च - 5 कोटी
  • एकूण 3 वर्षांसाठी 7 पेंग्विनवरचा खर्च - 15 कोटी

हेही वाचा - खूशखबर! काेकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचे ५ हजार तिकिटे शिल्लक

Last Updated :Sep 6, 2021, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.