ETV Bharat / state

महाराष्ट्रात राजकीय काला : दहीहंडी, आगामी सणांवरुन राज्य सरकार-विरोधक संघर्ष पेटणार?

author img

By

Published : Aug 31, 2021, 6:43 PM IST

भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम हे दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी घाटकोपरकडे निघाले असता खार पोलिसांनी राम कदम यांना खारमधील राहत्या घरी थांबवले. मात्र, उत्सव साजरा करण्यासाठी घाटकोपरमध्ये जाणार असा निर्धार राम कदम यांनी केला.

Opposition and ruling party once again face off over Dahihandi organisation
महाराष्ट्रात राजकीय काला

मुंबई - राज्यातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट पाहता अजूनही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सरकारने मनाई केली आहे. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारला भविष्यातील परिस्थिती पाहता याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. तर तेच दुसरीकडे सरकारने सणांना परवानगी न दिल्यामुळे विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. सरकारने दहीहंडीचा सण साजरा करायला परवानगी दिलेली नसतानाही भाजप आणि मनसेने दहीहंडी फोडत हा सण साजरा करण्याची भूमिका घेतली. राज्याच्या राजकारणात सण साजरा करण्यावरुन पुन्हा एकदा सरकार आणि विरोधक असा एक संघर्ष पाहायला मिळत आहे. याबाबत विरोधकांनी काय भूमिका घेतली आहे? तसेच सरकारचे काय म्हणणे आहे? याबाबत ईटीव्ही भारतने सविस्तर आढावा घेतला.

मनसेने दहीहंडी फोडली तर बाळा नांदगावकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात -

काळाचौकी येथे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी निर्बंध असतानाही दहीहंडी फोडली. याप्रकरणी बाळा नांदगावकरांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हिंदूंचे सण साजरे करायचे नाहीत का? आंदोलने चालतात, राजकीय जन आशीर्वाद यात्रा चालते, तिथे कोरोना येत नाही का? मात्र, आमचा हिंदूंच्याच सणांना परवानगी का नाही? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला. कोरोनाचे नियम पाळून पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडू द्या. आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळणार होतो. मात्र, पोलिसांनी त्यालासुद्धा नकार दिला. त्यामुळे आम्हाला अशाप्रकारे दहीहंडी फोडावी लावली आहे, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.

दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा भाजपचा निर्धार -

भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम हे दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी घाटकोपरकडे निघाले असता खार पोलिसांनी राम कदम यांना खारमधील राहत्या घरी थांबवले. मात्र, उत्सव साजरा करण्यासाठी घाटकोपरमध्ये जाणार असा निर्धार राम कदम यांनी केला. तसेच लसींचे दोन डोस घेणाऱ्या केवळ पाच नागरिकांना एकत्र येऊन दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी राज्य सरकारने द्यायला हवी होती. मात्र, राज्य सरकारची परवानगी देत नाही. त्यामुळे आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा इशारा राम कदम यांनी राज्य सरकारला दिला.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरे करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे, कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत, त्याचे पालन करावेच लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख आहे. दुर्देवाने आज १०० टक्के राजकारण केले जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जनआशीर्वाद यात्रा, मारामारी चालते; फक्त सणांमधूनच कोरोना पसरतो का? - राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यात आमचा काय दोष? अशी खोचक टीका राज यांनी केली. गेल्या वर्षीही दहीहंडी साजरी केली नाही. गेल्या वर्षीची परिस्थिती आणि या परिस्थितीत फरक आहे. दुष्काळ आवडे सर्वांना त्याप्रमाणे लॉकडाऊन आवडे सरकारला असे सध्या दिसत आहे. यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मग पहिली, दुसरी तिसरी लाट येते. राज्य सरकारला नियम लावायचेच असतील तर मग ते सगळ्यांना एकसारखेच लावा. परंतु, सध्या सगळ्या राजकीय गोष्टी सुरळीत सुरु आहेत. नारायण राणे यांच्या घरासमोर हाणामारी सुरू, मेळावे सुरू, भास्कर जाधव यांच्या मुलासाठी मंदिरं उघडी करता; मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. यामुळे सणांवरच बंधनं का? म्हणून मी सैनिकांना सांगितलं सुरू करा. जे होईल ते होईल, अशी भूमिकाही राज यांनी घेतली आहे.

संजय राऊतांचा केंद्रीय गृहमंत्र्यांना सवाल?

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, मात्र मंदिरे उघडण्यासाठी राज्यातील भाजप आंदोलने करत आहे. यावर, नियमावली केंद्राने पाठवली आहे. जर भाजप नेत्यांवर कारवाई केली तर हे आम्हाला हिंदुत्वविरोधी ठरवतील. आता अमित शाहांच्या गृहखात्याने नियमावली जारी केली आहे, त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार का? असा उलट सवाल राऊत यांनी भाजपला विचारला आहे.

सण-उत्सवामुळे राज्यात तिसऱ्या लाटेचा केंद्र सरकारचा इशारा -

राज्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्ण संख्या काही प्रमाणात वाढू लागली आहे. तसेच राज्यामध्ये असलेले सण आणि उत्सव पाहता रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता देखील राज्य सरकारकडून वर्तवण्यात आली आहे. सण आणि उत्सव साजरे करत असताना तिसरा लाटेचा धोका निर्माण होऊ शकतो, असे पत्र केंद्रीय स्वास्थ्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी देखील राज्य सरकारला पाठवले आहे. मात्र, तरीही राजकीय हेतूने उत्सव सण साजरे करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी भूमिका भारतीय जनता पक्ष देत असल्याचा आरोप आघाडीचा नेत्यांकडून केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.