ETV Bharat / state

...अशी विधानसभा निवडणूक होणे नाही! ऐतिहासिक निकालाची वर्षपूर्ती

author img

By

Published : Oct 24, 2020, 11:29 AM IST

Updated : Oct 24, 2020, 12:55 PM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 ला आज (शनिवार) एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षपूर्ती दिवसानिमित्त काही ठळक घडामोडींचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा...

ऐतिहासिक निकालाची वर्षपूर्ती
ऐतिहासिक निकालाची वर्षपूर्ती

हैदराबाद - 2019 ची विधानसभा निवडणूक राज्याच्या इतिहासात ऐतिहासिक ठरली. सत्तापालटाचे ते दिवस अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. एखाद्या सिनेमातील थरारासारख्या दररोज नव्या घडामोडी, नवी समीकरणे, आमदारांची जुळवाजुळव सुरू होती. अर्थातच निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर या घडामोडींना प्रचंड नाट्यमय वेग आला. 22 ऑक्टोबर 2019 ला शेवटच्या टप्प्यातील निवडणूक पार पडली आणि 24 ऑक्टोंबरला निकाल जाहीर झाले. भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधात बसणार असल्याचे सांगितले. मात्र शिवसेनेने 'फिफ्टी-फिफ्टी'ची आठवण करून देत भाजपाची दांडी 'गुल' केली आणि खऱ्या रोमांचक सामन्याला सुरूवात झाली. त्यानंतरच्या सर्व नाट्यमय घडामोडी सर्वांना ठाऊक आहे. या सगळ्या नाट्याला कारणीभूत ठरला तो 24 ऑक्टोबर 2019 हा दिवस. 2019 विधानसभा निवडणूक निकालाच्या एक वर्षपूर्ती दिवसानिमित्त काही ठळक घडामोडींचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा...

भाजप-सेना युती

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने युती धर्म पाळत एकत्र निवडणूक लढवली. भाजपाविषयी शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे अनेक मतदारसंघामध्ये बंडखोर उमेदवार तयार झाले. या उमेदवारांनी प्रस्थापित नेत्यांना आव्हान दिले. त्याचा फटका दोन्ही पक्षाला बसला. तर दोन्ही पक्षांनी बंडखोरांच्या माध्यमातून एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. निकालामध्ये भाजपच्या जवळपास 13 जागा घटल्या तर शिवसेनेच्या सात जागा कमी झाल्या. त्यात सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी कॉग्रेसला झाला आणि 13 नवे आमदार वाढून एकुण संख्याबळ 54 झाले. तर काँग्रेसची एक जागा वाढली. निकालामध्ये भाजपाला 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54, काँग्रेस 44, मनसे 01 आणि अपक्ष 28 अशी परिस्थिती होती. युतीला स्पष्ट बहुमत असले तरी, शिवसेनेने सत्तेत समान वाटा देऊन दिलेला शब्द पाळण्याचे भाजपाला सांगितले. परिणामी देवेंद्र फडणवीसांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंगले.

भाजप-सेना युती
भाजप-सेना युती

भाजपाची 'मेगाभरती'

भाजपाने विरोधी पक्षातील अनेकांच्या मागे ईडी, सीबीआय आणि चौकशांचे शुक्लकाष्ट लावून त्या नेत्यांना भाजपात ओढण्याचा प्रयत्न केला. अनेक दिग्गज नेते याला बळी पडले. दररोज नव-नवीन चेहरे भाजपात जात होते. तरूणांना नोकऱ्या देण्यासाठी 'मेगाभरती' काढणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मात्र भाजपाने पक्षात मेगाभरती सुरू केल्याने निष्ठावान कार्यकर्ते दुखावले गेले. तसेच सामान्य नागरिकांच्या मनात गयारामांबाबत द्वेषाची भावना निर्माण झाली. भाजपाला त्याचा फटका निवडणुकीत बसला. पक्ष बदलून भाजपा आणि सेनेत गेलेल्या अनेक दिग्गजांना मतदारांनी घरी बसवून त्यांची जागा दाखवून दिली. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले छत्रपतींचा पराभव हे त्याचे उत्तम उदाहरण.

भाजपमध्ये अनेक दिग्गजांनी प्रवेश केला
भाजपमध्ये अनेक दिग्गजांनी प्रवेश केला

कलम 370

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यात जोरदार प्रचार केला. पंतप्रधान मोदी, अमित शाहंसह अनेक बडे नेते दाखल झाले होते. कलम 370 हा प्रचाराचा प्रमुख घटक होता. स्थानिक मुद्यांना बगल देत कलम 370 वर भाषणे देणे मतदारांना पटले नाही. शिवाय अशा प्रचाराला विरोधकांनी टारगेट करून शेतकरी, दुष्काळ, रोजगार, महिला या विषयांवर भर दिला. त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला.

पवारांचा लढवय्यापणा - ईडी ची नोटीस

राज्य सहकारी बँक प्रकरणी शरद पवारांना 'ईडी'ने नोटीस दिली आणि निवडणुकीची हवा पालटली. पवारांनी 'ईडी'ला अंगावर घेत, चौकशीसाठी स्वत: कार्यालयात येतो म्हणून 'ईडी'ला घाम फोडला. तसेच ईडी कार्यालयात स्वत: जाणार असून कार्यकर्त्यांनी गर्दी न करण्याचे पवारांनी आवाहन केले. मात्र पवारांच्या या म्हणण्याचा अर्थ कार्यकर्त्यांनी जो घ्यायचा तो घेतला आणि राज्यभरात भाजपा विरोधात निदर्शेन सुरू झाली. त्यानंतर पवारांना चौकशीसाठी येण्याची गरज नसल्याचे, खुद्द मुंबई पोलीस आयुक्तांनी पवारांच्या घरी जावून सांगितले आणि पवार ईडी वर भारी पडले.

ईडी ने नोटीस दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहे गर्दी केली
ईडी ने नोटीस दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहे गर्दी केली

निवडणुकीचे चित्र पालटणारी सभा

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याप्रमाणे 2019 ची निवडणूक ऐतिहासिक ठरली, त्याचप्रमाणे साताऱ्यातील 21 ऑक्टोबरची शरद पवारांची सभा देखील ऐतिहासिक ठरली आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटीवर निवडणूक आलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश पवारांच्या जिव्हारी लागला. पोटनिवडणुकीत भाजपाकडून उदयनराजे भोसले विरूद्ध राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील असा सामना रंगला. शरद पवारांच्या सभेला तरूणांनी मोठा प्रतिसाद होता. शरद पवारांचे भाषण सुरू असताना वरूणराजा प्रसन्न झाला आणि ऐंशी वर्षाच्या तरूणाने भर पावसात सभा गाजवली. सातारच्या सभेची चर्चा अख्या महाराष्ट्रात सुरू झाली. पवारांच्या लढवय्येपणाची पुन्हा एकदा प्रचिती झाली. सोशल मिडियावर पावसातील भाषणाचे फोटो जोरदार व्हायरल झाले. या एका सभेने निवडणुकीचे चित्र पालटण्यास मदत झाली.

निवडणुकीचे चित्र पालटणारी सभा
निवडणुकीचे चित्र पालटणारी सभा
Last Updated :Oct 24, 2020, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.