ETV Bharat / state

Contract Police Bharti : राज्यात कंत्राटी पोलिसांची भरती होणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले..

author img

By

Published : Jul 26, 2023, 9:07 PM IST

Updated : Jul 26, 2023, 10:55 PM IST

Contract Police Bharti
कंत्राटी पोलीस भरती

विरोधकांनी सरकारवर कंत्राटी पोलीस भरतीचा आरोप केला आहे. या आरोपांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत उत्तर दिले. 'राज्यात पोलिसांची कंत्राटी नियुक्ती नाही. असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही', असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्य विधिमंडळात पोलीस कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी मुंबईत सुमारे 10,000 पोलिसांची कमतरता असल्याचे म्हटले आहे.

मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता : विधानपरिषदेत दिलेल्या निवेदनात गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून (MSSC) 3,000 पोलीस कर्मचारी मागवले आहेत. ते म्हणाले की, मुंबई पोलीस दलात सुमारे 10,000 कर्मचार्‍यांची कमतरता आहे. या कमतरतेमुळे देशाच्या आर्थिक राजधानीचे पुरेसे संरक्षण करणे शक्य नाही. कोठेही पोलीस कर्मचारी कंत्राटावर घेतले जात नाहीत. त्यामुळे ते महाराष्ट्रातही घेतले जाणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी आधी विधानसभेत सांगितले होते.

'ही पोलिसांची कंत्राटी नियुक्ती नाही' : विधानपरिषदेत निवेदन देताना फडणवीस म्हणाले की, एमएसएससीकडून मागवण्यात आलेले 3,000 कर्मचारी सुरक्षा, गार्डशी संबंधित कामे आणि इतर कामांसाठी वापरले जातील. त्यांना तपास किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीशी संबंधित कोणतेही काम दिले जाणार नाही. ही पोलिसांची कंत्राटी नियुक्ती नाही. असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलिस कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांच्या टीकेनंतर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु : फडणवीस म्हणाले की, मुंबई पोलीस दलात 10,000 पदे रिक्त आहेत. दरवर्षी 1,500 कर्मचारी सेवेतून निवृत्त होतात. 2019, 2020 आणि 2021 मध्ये पोलीस दलात नवीन भरती झाली नाही. तीन वर्षांपूर्वी कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून सुमारे 500 पोलिसांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यभरात 18,331 पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये 14,956 पोलीस कॉन्स्टेबल, 2,174 ड्रायव्हर (कॉन्स्टेबल रँकचे), आणि राज्य राखीव पोलीस दल (SRPF) जवानांचा समावेश आहे. मुंबईसाठी 18,331 पोलीस कर्मचार्‍यांची भरती होत आहे. त्यापैकी 7,076 पदे हवालदारांची आहेत आणि 994 चालक (कॉन्स्टेबल दर्जाची) आहेत, असे फडणवीस म्हणाले.

पटोलेंच्या टीकेला उत्तर : यापूर्वी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेसचे आमदार नाना पटोले म्हणाले होते की, सरकार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पद्धतीने करत आहे. सरकारचे मंत्रीही कंत्राटी आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, कोणताही मंत्री कंत्राटी नाही. मात्र तुम्हाला कंत्राटावर यायचे असेल तर आम्ही विचार करू, असा टोला त्यांनी पटोलेंना लगावला होता.

हेही वाचा :

  1. Teachers Issue : आंतरजिल्हा बदल्याशिवाय शिक्षक भरती नको, विधानसभेत आमदारांची मागणी
  2. Contract Police Bharti : मुंबई कंत्राटी पोलीस भरती प्रक्रियेवरून विरोधक आक्रमक
Last Updated :Jul 26, 2023, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.