ETV Bharat / state

NCP Disqualification Case : मोहम्मद फजल, श्रीनिवास पाटील यांच्या अपात्रतेसाठी अजित पवार गटाची याचिका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 8:49 PM IST

NCP Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या अपात्रतेबाबत अजित पवार गटाने याचिका दाखल केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

NCP Disqualification Case
NCP Disqualification Case

सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद

मुंबई NCP Disqualification Case : लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे खासदार मोहम्मद फजल, श्रीनिवास पाटील यांच्या अपात्रतेबाबत अजित पवार गटानं याचिका दाखल केलीय. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केल्याचं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही लोकशाही मार्गानं भांडत आहोत. राज्यातील जनतेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार, भावना पोहोचवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. यासाठी येत्या पाच नोव्हेंबरपासून पूर्व विदर्भात दौरा करणार असल्याचं तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

खासदार अमोल कोल्हे आमच्या सोबत : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटातील खासदार, आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तसंच याचिकेवर लवकर सुनावणी करावी, अशी देखील मागणी त्यांनी केली होती. त्यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हीही खासदार मोहम्मद फजल, श्रीनिवास पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी याचिका दाखल केलीय. आम्ही लोकशाही मानतो, त्यामुळं लोकशाहीनुसार आमच्याकडं बहुमत आहे. त्यामुळं आम्हाला कारवाईची भीती नाही. खासदार अमोल कोल्हे देखील आमच्या सोबत आहेत. त्यांचे आम्हाला समर्थन आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचा प्रश्नच येत नाही, असेही तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पूर्व विदर्भात करणार दौरा : पुढे बोलताना तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्यातील जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी दौरे करण्यात येणार आहे. येत्या पाच नोव्हेंबरपासून आठ नोव्हेंबरपर्यंत पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये दौरा होणार आहेत. या दौऱ्यात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांच्या सहकार्यानं जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल असल्याचं तटकरे यांनी म्हटलंय.

घड्याळ तेच नवी वेळ : पक्षाच्या वतीनं आम्ही घड्याळ तेच नवी वेळ ही नवी टाकलाईन घेऊन येत आहोत. राजकीय स्थित्यंतरानंतर घड्याळ तेच असलं, तरी नवी वेळ, दर्शवण्याचा प्रयत्न करत आहोत. नवा निर्धार अजित पर्व या लाईनवर आम्ही काम करत आहोत. प्रत्येक पक्षाला वाटतं, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. ही आमची इच्छा आहे पण आम्हाला घाई नाही, सध्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात योग्य काम सुरू आहे, असेही तटकरे म्हणाले.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : घर जाळण्याचा प्रकार इंग्रजांच्या काळात देखील झाला नव्हता - जयदत्त क्षीरसागर
  2. BJP Protest In Pune University : मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आक्षेपार्ह लिखाण; भाजपाकडून तीव्र निषेध
  3. Maratha Reservation : 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या - मनोज जरांगे पाटील
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.