ETV Bharat / state

Mumbai Pollution : मुंबई महानगराचा श्वास कोंडला! महाविकास आघाडीचा 'कृती आराखडा' लागू करा, काँग्रेसची मागणी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 12:08 PM IST

Mumbai Pollution
मुंबई महानगराचा श्वास कोंडला! महाविकास आघाडीचा 'कृती आराखडा' लागू करा, काँग्रेसची मागणी

Mumbai Pollution : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणात सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. तसंच मुंबईची हवा दिल्लीपेक्षा खराब असून, पालिकेकडून नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा 'कृती आराखडा' लागू करा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलीये.

Mumbai Pollution : मागील काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणाचं प्रमाण वाढत चालल्याचं बघायला मिळत आहे. सध्याची परिस्थिती इतकी भीषण आहे की, पालिकेकडून नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान, यावरुनच आता राज्य सरकारनं महाविकास आघाडी सरकारच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या : काही वर्षांपूर्वी दिल्लीत हवेच्या गुणवत्तेची पातळी सर्वात खराब होती, मात्र मुंबईनं दिल्लीलाही मागं टाकलंय. धुक्यामुळं उष्मा आणि आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळं मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, श्वसनाचे आजारही वाढले आहेत. त्यामुळं राज्य सरकारनं मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या मुंबई हवामान कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी. किमान सार्वजनिक हिताच्या बाबतीत तरी त्यांनी विरोधी पक्षांच्या मतांचा विचार करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

क्षुल्लक राजकारणासाठी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आणू नये : पुढं त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या मुंबई हवामान कृती आराखड्यानुसार, बांधकामाच्या तासांचं नियोजन, बांधकामाच्या ठिकाणी वायू आणि ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी, विविध भागात इकोपार्कची निर्मिती आणि डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावणे यावर उपाययोजना करता येतील. त्यामुळं सरकारनं क्षुल्लक राजकारणासाठी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आणू नये आणि योजना राबविण्याचा गांभीर्यानं विचार करावा. सध्याच्या परिस्थितीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचेही हाल होत आहेत. यावर सरकार आणि महापालिकेने ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.

सध्याच्या सरकारला महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ नाही : वाहतूक कोंडीचं संकट सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड कॉरिडॉर, विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल, कोस्टल रोड यासह अनेक प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला होता, याशिवाय आणखी रस्त्यांचे काँक्रिटीकरण केलं होतं. मात्र, सध्याच्या सरकारला महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ नसल्यामुळं हे प्रकल्प रखडले आहेत. ही लोकं फक्त इतर पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत,अशी टीकाही गायकवाड यांनी केली.

हेही वाचा -

  1. नाशिक : मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन
  2. Congress On Manoj Jarange Patil : दोन उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची फसवणूक केल्याचं स्पष्ट; काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
  3. Nana Patole On Mungantiwar: बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला उत्तर देण्याची गरज नाही, मुनगंटीवारांना उत्तर देण्यास नानांचा नकार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.