ETV Bharat / state

Mumbai Crime News: गुप्तचर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाची फसवणूक; चार कोटींना गंडा घालणारा गजाआड

author img

By

Published : Jul 21, 2023, 12:37 PM IST

Mumbai Crime News
आदित्य अशोक जोगाणी उर्फ अजय दवे

फसवणूकीच्या घटना मुंबईत नवीन नाही. आता सांताक्रूझ येथे गुप्तचर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तब्बल 4 कोटी रूपये व्यावसायिकाकडून उकळले आहेत. या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुप्तचर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून सांताक्रूझ येथील व्यावसायिकाची 3.93 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यास बेड्या ठोकल्या आहे. या फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आदित्य अशोक जोगाणी उर्फ अजय दवे (वय 44) याला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी जोगनी याच्यावर 15 गुन्हे दाखल केले आहेत.

तीन कोटी 93 लाख रुपयांना चुना : महापालिका आयुक्तांचा खाजगी सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव किंवा गुप्तचर विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून गंडा घालणाऱ्या आदित्य अशोक जोगाणी उर्फ अजय दवे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या ठगाने सांताक्रूझ येथील एका व्यावसायिकाला लायझनिंगच्या कामात मदत करून देण्याच्या नावाखाली, त्याचप्रमाणे गुन्ह्यात अडकल्याची भीती घालून तीन कोटी 93 लाख रुपयांना चुना लावला आहे.

पैसे उकळण्यास सुरुवात : सांताक्रूझ येथील तक्रारदार संतोष बेंद्रे (वय 50 वर्ष) हे लायझनिंग समन्वयक म्हणून काम करतात. 2018 मध्ये अशोक जोगाणी याने अजय दवे नावाचा वापर करत तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांचा खाजगी सहाय्यक असून त्यांचे सहा पाहुणे हॉटेलमध्ये जेवणासाठी येणार असल्याने त्यांची व्यवस्था करण्यास सांगितले. बेंद्रे यांनी विश्वास ठेवून व्यवस्था केली. त्यानंतर काही दिवसांनी जोगाणीसोबत मुंबईत भेट घेतली. आरोपीने स्वतः गुप्तचर विभागात तसेच दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी काम करत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. बेंद्रेना विविध कामात मदत करण्याचे आश्वासन दिले. पुढे विविध कारणांनी पैसे उकळण्यास सुरुवात केली. पैशांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने बेंद्रे यांना संशय आला.

निर्वाणा इंडिया ग्रुपचा संचालक : 1 जून 2018 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान जोगाणी याने व्यावसायिक संतोष बेंद्रे यांच्याकडून तीन कोटी 93 लाख 55 हजार रुपये उकळले. पैसे त्याच्या निर्वाणा इंडिया ग्रुप कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. तो निर्वाणा इंडिया ग्रुपचा संचालक आहे. आदित्य अशोक जोगाणी हा नेपियन्सी रोड येथील रहिवासी आहे. यापूर्वी त्याने अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी असल्याचे भासवून पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलची 95 हजार रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्यासह त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. Easy Pay Company: इझी पे कंपनीला एजंटांनीच घातला साडेतीन कोटींचा गंडा; पुणे सायबर पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
  2. Mumbai Crime News : स्टेट बँकेची 80 कोटीची फसवणूक; सीबीआयकडून पार्थ फॉइल्सवर गुन्हा दाखल
  3. Fraud : उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरला लाखोंचा गंडा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.