ETV Bharat / state

विकृतीचा कळस! 64 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून; ट्रॉम्बे पोलिसांनी आरोपीला केली अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 9:42 AM IST

Mumbai Crime News : मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आलीय. 36 वर्षीय नराधमानं 64 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार करुन गंभीर जखमी केलंय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे.

Mumbai Crime News
संग्रहित छायाचित्र

मुंबई Mumbai Crime News : नराधमानं एका 64 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार करुन विवस्त्र अवस्थेत फेकून दिल्यानं खळबळ उडाली. ही घटना मुंबईतील ट्रॉम्बे परिसरात घडली. ट्रॉम्बे पोलिसांनी नराधमाला तत्काळ अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 376, 376 (2) (n), 325, 323, 504 अन्वये 19 डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता.

बलात्कार करुन विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून : ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 डिसेंबरच्या रात्री 11 ते 19 डिसेंबरच्या सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हा गुन्हा घडलाय. पीडित वृद्ध महिलेला आरोपीनं घरी सोडतो, असं सांगून त्याच्या राहत्या घरी घेऊन गेला. यावेळी नराधमानं पीडित वृद्ध महिलेवर जबरदस्तीनं अत्याचार केला. याला तक्रारदार वृद्ध महिलेनं विरोध केला असता, त्यानं शिवीगाळ केली. तसंच लाथा बुक्क्यांनी महिलेला मारहाण करुन महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेऊन वृद्ध महिलेला गंभीर दुखापत केली. वृद्ध पीडितेला सकाळी घराच्या बाहेर विवस्त्र अवस्थेत फेकून दिल्याचा दावा पीडितेनं केला.

64 वर्षाच्या वयस्कर अज्ञात महिलेवर बलात्कार करुन गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीस ट्रॉम्बे पोलिसांनी तात्काळ अटक करुन गुन्हा उघडकीस आणला. - रवींद्र रणशेवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ट्रॉम्बे पोलीस ठाणे

आरोपी ताब्यात : या घटनेबाबत माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक गरुड, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नानेकर आणि पथक, तसंच ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी पोहचलं. त्यांनी जखमी अवस्थेतील पीडित वृद्ध महिलेचा मोबाईल प्राप्त करुन त्याद्वारे तिची ओळख पटवली. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. पीडितेला तत्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालय इथं पाठवण्यात आलं. परिसरातील नागरिक तसंच खबऱ्यांकडं गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीनं माहिती घेऊन एका नराधमाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि पथक रवाना झालं. दोन पंचांच्या समक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पीडित वृद्ध महिलेचा राजावाडी रुग्णालय इथं जाऊन महिला पोलीस उपनिरीक्षक तायडे यांनी सविस्तर जबाब नोंद केला असून त्याप्रमाणं गुन्हा नोंद केला. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या नराधमाकडं कसून तपास केला असता, त्यानं हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळं त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. पुण्यात कोरियन युट्युबरची छेड काढणाऱ्या गुंडाला अटक, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला होता व्हायरल
  2. प्रेयसीला कारखाली चिरडल्याचं प्रकरण, पीडितेचा पोलिसांवरच आरोप; चौकशीसाठी एसआयटी स्थापन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.