ETV Bharat / state

Ashish Shelar : जिथं जाऊ तिथं खाऊ, नाही तर प्रकल्प अडवू; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 10:46 PM IST

मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आम्ही जिथं जाऊ तिथं खाऊ, नाही तर प्रकल्प अडवू असं ठाकरे गटाचे काम असल्याचा टोला शेलार यांनी ठाकरेंना लगावला आहे.

Ashish Shelar On Uddhav Thackeray
Ashish Shelar On Uddhav Thackeray

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसाच्या जपान दौऱ्यावरून आज मुंबईत परतले आहेत. फडणवीस यांनी जपान दौऱ्यात महाराष्ट्र तसेच मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी जपान बरोबर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या कारणास्तव मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा गट) उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुंबई विमानतळावर देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केल्यावर ते बोलत होते.

मुंबईला पूर मुक्त करणार : याप्रसंगी बोलताना शेलार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस 5 दिवसाच्या जपान दौऱ्यानंतर आज परतले. पण या दौऱ्यात त्यांनी मुंबई, महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना गती देण्याचे काम केलं. विरारपर्यंत वाढलेल्या पश्चिम उपनगराला वाहतूक कोंडीतून मुक्त करणारा वर्सोवा ते विरार ४२ किमीचा सागरी सेतू प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. तसेच मुंबईला टोकियो प्रमाणे पूर मुक्त करणारा स्वतंत्र प्लॅन तयार करण्यासाठी फडणवीस पुढाकार घेणार असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा या भुयारी मेट्रो क्रमांक ११ साठीसुद्धा जपाननं मदतीची भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जपान सरकारनं सकारात्मक चर्चा केली आहे. जिथे जाऊ तिथून
मुंबई, महाराष्ट्रासाठी काही तरी घेऊन येऊ असं भाजपाचं काम आहे. नाही तर उबाठा गटाचं ठरलेले आहे. जिथं जाऊ तिथं खाऊ! नाहीतर प्रकल्प अडवू! हे प्रकार मुंबईकरांना माहिती आहे. असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

रोहित पवार यांचा पराभव करू : भाजपामुळं निवडणुका लांबल्या आहेत, असे विधान शरद पवार यांनी केलं आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, शरद पवार फार मोठे नेते आहेत. ते विचारपूर्वक बोलतात, असा माझा समज होता. परंतु त्यांनी निवडणुकीबाबत केलेलं वक्तव्य पाहता त्यांच्या विधानावर १०० टक्के संशय येतो. पवार साहेबांना माहितीय, निवडणूक घेण्याचं काम निवडणूक आयोग करतं. निवडणूक आयोग जेव्हा निवडणुका जाहीर करेल, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. तरीही पवार साहेबांना निवडणुका घ्यायची खुमखुमी असेल, तर त्यांनी त्यांच्या खासदारांना, आमदारांना राजीनामा द्यायला सांगावं. अगदी आमदार रोहित पवार यांच्यासहित तिथं निवडणूक आयोग पोटनिवडणुका घेईल. तेव्हा आम्ही त्यांच्याशी चार हाथ करायला तयार आहोत, तसचं रोहित पवार यांचा पराभव करू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसची कोल्हे कुई : विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या हर घर अभियानावर टीका केली आहे. त्यावर बोलताना शेलार म्हणाले की, भाजपाचं हर घर अभियान हे प्रत्येक घरापर्यंत, मतदारापर्यंत पोहचण्यासाठी आहे. काँग्रेस, विजय वडेट्टीवार या राजकीय नेत्यांना जनता घरात घ्यायला तयार नाही, म्हणून त्यांची कोल्हे कुई सुरू आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊतांना दुसऱ्याचा घरात डोकावण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांच्या पक्ष रसातळाला गेला आहे. दुसऱ्याच्या घरात डोकावल्यामुळं त्यांच्या पक्षाची हानी झाली आहे. तर संजय राऊत यांचं पक्षातील स्थान कमी झालं आहे. संजय राऊत यांना कोणी गांभीर्याने घेत नाही, असेही शेलार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. Nana Patole : काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार? नाना पटोले म्हणाले, आमचा पक्ष...
  2. Devendra Fadnavis : नाना पटोलेंना माफ केलं; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले असं?
  3. Devendra Fadnavis Reaction : जपानी म्हणतात चीनपेक्षा भारतातील गुंतवणूक सुरक्षित - देवेंद्र फडणवीस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.