ETV Bharat / state

'अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी कुलगुरूंची समिती गठीत; उद्याच सादर करणार अहवाल'

author img

By

Published : Aug 29, 2020, 5:51 PM IST

Updated : Aug 29, 2020, 10:50 PM IST

minister uday samant
मंत्री उदय सामंत

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिल्यानंतर या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पावले उचलली आहेत. याबाबत त्यांनी आज समिती गठीत केली असून उद्याच याबाबत अहवाल सादर करण्याच्या सुचना समितीला देण्यात आल्या आहेत.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय दिल्यानंतर या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी आज (दि. 29 ऑगस्ट) राज्यातील कुलगुरुंसह झालेल्या बैठकीत कुलगुरूंची समिती गठीत करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.

कुलगुरूंची ही समिती राज्यातील सर्वच विद्यापीठातील परिस्थिती आणि जिल्ह्यात असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या परीक्षा केव्हा घेतल्या जातील, तसेच त्या परीक्षांच्या संदर्भात काय तरतुदी करता येतील यासाठीचा आढावा आज घेऊन त्याचा अहवाल समिती उद्याच तातडीने सरकारला देणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज (शनिवार) राज्यातील कुलगुरूंची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या सर्व कुलगुरुंना या परीक्षा घेण्यास संदर्भातील अडचणी आणि त्यातील तरतुदींवर सविस्तर चर्चा केली. त्यानंतर कुलगुरुंचे मत जाणून घेऊन यासाठीची समिती गठीत करण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला.

अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करताना राज्यातील एकाही विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याचा त्रास होणार नाही किंवा विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली. या परीक्षा सहज, सुलभ पद्धतीने कशा आणि कधी घेता येतील यासाठीच कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात झूमच्या माध्यमातून 13 अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरुंसह ऑनलाइन बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली.

सामंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठांनी एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का? याबद्दलही विचार करावा, आशा सूचना सामंत यांनी दिल्या. त्यासोबत विद्यार्थ्यांची परिक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षाकशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी आज कुलगुरूची एक समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर तातडीने म्हणजेच उद्या रविवारी (30 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश सामंत यांनी दिले आहेत. समितीच्या निर्णयानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही सामंत यांनी संगितले.

बैठकीत गोवा, दिल्ली, मध्यप्रदेश, बनारस विद्यापीठांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत. याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सहभागी होते.

हेही वाचा - दार उघड उद्धवा, दार उघड; भाजपचे राज्यभर घंटानाद आंदोलन

Last Updated :Aug 29, 2020, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.