ETV Bharat / state

मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांत १३-१४ जून दरम्यान हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

author img

By

Published : Jun 11, 2021, 9:27 PM IST

भारतीय हवामान विभागामार्फत नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार (१३-१४) जून या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी 'अतिवृष्टी'चा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांत १३-१४ जून दरम्यान हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा
मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांत १३-१४ जून दरम्यान हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

मुंबई - भारतीय हवामान विभागामार्फत नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार (१३-१४) जून या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी 'अतिवृष्टी'चा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारे व समुद्र किनाऱ्यालगत जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन महानगरपालिकेडून करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेने हाय अलर्टवर जारी केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

'नियंत्रण कक्ष हाय अलर्टवर'

मुंबईमध्ये 'अतिवृष्टी'चा इशारा देण्यात आला असल्याने, विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आला असून, सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. महानगरपालिकेचे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष हे आवश्यक मनुष्यबळ व साधन सामुग्रीसह सज्ज झाले आहेत, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

'मिठी नदीजवळ एनडीआरएफ'
मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने, क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त एल. विभाग यांना देण्यात आली आहे. तसेच, येथे मदतीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथे तैनात करण्यात आली आहे.

पोलीस, अग्निशमन, एनडीआरएफ, नेव्ही, कोस्ट गार्ड सज्ज

पालिकेच्या अग्निशमक दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह ६ प्रादेशिक केंद्रावर तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर आहे. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून ते देखील आवश्यकतेनुसार मदतीकरिता तत्पर आहेत. बेस्ट (बीईएसटी) (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन हाय अलर्टवर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत. अणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.