ETV Bharat / state

चोरीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र अव्वल, तर सिक्कीममध्ये सर्वाधिक कमी गुन्हे

author img

By

Published : May 31, 2021, 5:45 PM IST

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2017 ते 2019 या तीन वर्षाच्या काळामध्ये देशात महाराष्ट्र हा चोरीच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक पुढे असून यात सतत वाढ होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

National Crime Records Bureau
चोरीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र अव्वल, तर सिक्कीममध्ये सर्वाधिक कमी गुन्हे

मुंबई - देशभरात चोरीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र हा अव्वल ठरला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2017 ते 2019 या तीन वर्षाच्या काळामध्ये देशात महाराष्ट्र हा चोरीच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक पुढे असून यात सतत वाढ होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

रिपोर्ट

देशात घडलेल्या चोरी व त्यांची वसूली -

गेल्या तीन वर्षांमध्ये भारतामध्ये चोरीचा प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये 2017 मध्ये 5002 कोटी रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाली होती. यामध्ये तब्बल 1296 कोटी रुपयांची मालमत्ता पुन्हा मिळविण्यात आली आहे. 2018 मध्ये तब्बल 5211 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेली होती. ज्यामध्ये 1827 कोटी रुपयांची मालमत्ता ही पुन्हा हस्तगत करण्यात आली आहे. तर 2019 मध्ये 4719 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेली असून यामध्ये 1451 कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी तपास करून पुन्हा मिळवली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक चोरीचे प्रकरण -

मालमत्ता चोरीच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडत असून 2017 मध्ये तब्बल 1521 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेली आहे. यामध्ये केवळ 207 कोटी रुपयांची मालमत्ता पुन्हा रिकव्हर करण्यात आली आहे. तर 2018 मध्ये 1403 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेली आहे. यामध्ये 754 कोटी रुपयांची मालमत्ता पुन्हा मिळविण्यात आली आहे. तसेच 2019 मध्ये तब्बल 977 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेली आहे. यामध्ये केवळ 280 कोटी रुपयांची मालमत्ता पुन्हा हस्तगत करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील गुन्ह्यांचे प्रमाण -

उत्तर प्रदेशमध्ये 2017 मध्ये 293 कोटी रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाली. यामध्ये 100 कोटींची मालमत्ता रिकव्हर करण्यात आली आहे. 2018 मध्ये 324 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्यानंतर यामध्ये 14 कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. तर 2019 मध्ये 279 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्यानंतर तब्बल 100 कोटी रुपयांची मालमत्ता पुन्हा रिकव्हर करण्यात आली आहे.

तेलंगणा मधील गुन्ह्यांचे प्रमाण -

तेलंगणामध्ये 2017 मध्ये 120 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीस गेली असून 62 कोटी रुपयांची मालमत्ता ही हस्तगत करण्यात आली आहे. 2018 मध्ये 160 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीस गेल्यानंतर 113 कोटी रुपयांची मालमत्ता यातून हस्तगत करण्यात आलेली असून 2019 मध्ये केवळ 128 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीस गेल्यानंतर 71 कोटी रुपयांची मालमत्ता पुन्हा पोलिसांनी हस्तगत केलेली आहे.

आंध्र प्रदेशमधील गुन्ह्यांचे प्रमाण -

आंध्रप्रदेश मध्ये 2017 मध्ये 127 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्यानंतर 56 कोटी रुपयांची मालमत्ता ही रिकव्हर करण्यात आली होती. तर 2018 मध्ये 112 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्यावर 49 कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी पुन्हा मिळवली आहे. 2019 मध्ये 130 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्यानंतर 62 कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी तपास करून पुन्हा मिळवली आहे.

सिक्कीम राज्यात सर्वात कमी मालमता चोरी -

देशात सिक्कीम हे एक मात्र असे राज्य आहे, जिथे सर्वात कमी मालमत्ता चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. 2017 मध्ये 1 कोटी 50 लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्यानंतर यामध्ये 40 लाखांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. 2018 मध्ये ते 20 कोटी रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्यावर 1 कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. 2019 मध्ये हेच प्रमाण पुन्हा घटले असून तब्बल 1 कोटी 50 लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्यानंतर 40 लाखांची मालमत्ता पोलिसांनी पुन्हा रिकव्हर केली आहे.

या प्रकारच्या मालमत्ता झाल्या चोरी -

देशभरात मालमत्ता चोरी होण्याच्या प्रकरणांमध्ये वाहनचोरी, दुचाकी वाहनांची चोरी, सरकारी वाहनांची चोरी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, मोबाइल फोन, लॅपटॉप, संगणक, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घरातील फर्निचर, पाळीव जनावरे व इतर प्रकरणातील वस्तूंच्या चोरींचा समावेश यात आहे.

अशी आहे चोरीची आकडेवारी -

घरात होणाऱ्या चोऱ्यांचे गुन्ह्यांचे प्रमाण प्रमाण 2019 मध्ये तब्बल 2 लाख 92 हजार 176 एवढे असून रस्त्यावर मालमत्ता चोरी होण्याचे प्रमाण हे 2 लाख 8740 एवढे आहे. महामार्गावर मालमत्ता चोरी होण्याचे प्रमाण तब्बल 18406 असून रेल्वेत मालमत्ता चोरी होण्याचे प्रमाण हे 58343 एवढे आहे. मेट्रो रेल्वेत आतापर्यंत मालमत्ता चोरी होण्याचे प्रमाण 6631 असून विमानतळावर 343 गुन्हे मालमत्ता चोरीच्या संदर्भात नोंदविण्यात आलेले आहेत. नदी-समुद्रमार्गे चोरी होण्याचे गुन्हे 2268 एवढे नोंदवण्यात आलेली असून सरकारी आस्थापण मधून मालमत्ता चोरीचे 1701 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये मालमत्ता चोरीचे 5728 गुन्हे नोंदविण्यात आले असून धार्मिक स्थळांवर मालमत्ता चोरीचे 8759 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बँकांच्या परिसरामध्ये चोरी होण्याचे 2735 गुन्हे नोंदविण्यात आले असून एटीएममध्ये चोरी होण्याचे 1792 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. खासगी व सरकारी गोडाउनमध्ये चोरीचे 6226 गुन्हे नोंदविण्यात आले असून शेतात मालमत्ता चोरीचे 7326 गुन्हे देशभरात नोंदविण्यात आले आहेत. आतापर्यंत देशभरात 8 लाख 15 हजार 312 गुन्हे हे 2019 मध्ये नोंदवण्यात आले आहेत.

हेही वाचा - मुंबई : इंधनाच्या किमती सलग तिसऱ्या दिवशी शंभरी पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.