ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस करणार झंझावाती दौरा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 28, 2023, 10:19 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान करण्यासाठी भाजपाने देशभरातमध्ये कंबर कसली आहे. राज्यातही भाजपाने मिशन ४५ आखले असून ते यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आहे. राज्यात शिंदे-फडणवीस-अजित पवार या तिघांची महायुती आहे. या तिघांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली असली तरी त्यामध्ये महत्त्वाची मुख्य भूमिका देवेंद्र फडणवीस हेच बजावणार आहेत.

Maharashtra Political news
Maharashtra Political news

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे फेब्रुवारी महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी रोज तीन सभा घेण्याचे ठरवलं आहे. याकरिता निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राज्यात भाजपाकडून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या दौऱ्याबाबत अद्याप वेळापत्रक जाहीर झालं नाही. हे वेळापत्रक येत्या नववर्षात सुरुवातीलाच जाहीर केलं जाणार असल्याची माहिती समोर आली.


४५ जागा जिंकण्याचा निर्धार- लोकसभा निवडणुक जागांसंदर्भात देशात उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून कुठल्याही परिस्थितीत त्यापैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या सभांमध्ये महायुतीतील खासदार व आमदारसुद्धा असणार आहेत. एकंदरीत लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपा पूर्ण तयारीनिशी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लोकसभेच्या रिंगणात उतरून प्रचाराचा धुरळा उडवणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणाऱ्या विधासभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपाकडून ठरवला जाणार आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासाठी लोकसभा निवडणूक हा कसोटीचा क्षण आहे.

महाविकास आघाडीला जास्त जागा? पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं मागील वर्षभरापासून राज्यात प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात व देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धा सुद्धा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नुकतेच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार राज्यात महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा लोकसभेत जास्त जागा भेटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा तर इतरांना २ जागा मिळतील, असा अंदाज सर्वेतून करण्यात आला. या सर्वेकडं भाजपाकडून दुर्लक्ष करण्यात आलं आहे. असे असले तरी भाजपा विरोधकांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे.



भाजपाचा आत्मविश्वास दुणावला-पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावला असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीतील शिंदे व अजित पवार गटाच्या नेत्यांनीसुद्धा लोकसभेच्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे. तर देशात सत्ता बदल होणार असल्याचा विश्वास ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. अशातच नरेंद्र मोदी पुन्हा २०२४ रोजी पंतप्रधान पदी विराजमान होऊन हॅट्रिक साजरी करणार असल्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल गांधी यांनी कितीही यात्रा काढल्या तरी त्याचा फारसा परिणाम हा देशात किंवा महाराष्ट्रामध्ये होणार नाही. मागील ९ वर्षांमध्ये मोदींनी केलेल्या विकास कामावरच जनता त्यांना पुन्हा निवडून देईल, यामध्ये कुठलंही दुमत नाही- भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर

राज्यामध्ये भाजपाची सध्या घौडदौड सुरू- देवेंद्र फडवणीस यांच्या राज्यातील लोकसभेच्या झंझावती प्रचाराविषयी बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार कालिदास कोळंबकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. आताच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये देवेंद्र फडवणीस यांचा झंझावती प्रचार पाहायला भेटला. त्याचे सकारात्मक परिणामसुद्धा दिसून आले. विशेष म्हणजे राज्यामध्ये भाजपाची सध्या घौडदौड सुरू आहे. त्यामध्ये देवेंद्र फडवणीस यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीत राज्यात मिशन ४५ गाठण्याचं लक्ष्यही देवेंद्र फडवणीस यांनी ठरवलं आहे. भाजप व मित्रपक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये हे लक्ष्य गाठणार आहेत.

हेही वाचा-

  1. मुख्यमंत्री पदाच्या हुलकावणीनंतरही देवेंद्र फडणवीस राज्यात ठरले सर्वाधिक वजनदार नेते, नव्या वर्षात काय असणार आव्हाने?
  2. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट, राज्यातील जनतेला पदवी केली समर्पित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.