ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वरून रात्री उशिरा पडले बाहेर, नवीन राजकीय खलबते

author img

By

Published : Jul 7, 2023, 9:19 AM IST

Updated : Jul 7, 2023, 9:48 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी रात्री भेट घेतली. ते गुरूवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरून बाहेर पडले होते. त्यामुळे वर्षावर गुरूवारी रात्री आणखी काही राजकीय खलबतं शिजले असल्याचा, अंदाज वर्तविला जात आहे.

Maharashtra Political Crisis
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई : शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या गटांमधील तीव्र सत्तासंघर्ष सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी वर्षा येथे गुरूवारी भेट घेतली. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना दिसले. शिंदे यांनी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठकही घेतली होती.

१ तास चर्चा : वर्षभरापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तसेच महामंडळाचे वाटप कधी होणार याबाबत शिंदे व फडणवीस गटातील आमदारांमध्ये उत्सुकता असताना अजित पवार यांची राज्याच्या सत्तेत झालेल्या एन्ट्रीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवारांच्या प्रवेशाने विशेष करून शिंदे गटांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अस्वस्थता आहे. ही नाराजगी मागील दोन दिवसांपासून उघडपणे दिसून येत आहे. याच कारणाने गुरूवारी रात्री मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे आयोजित केलेल्या स्नेहभोजनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट नंदनवन बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर त्यांच्यामध्ये सुमारे १ तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार व महामंडळ वाटप : या चर्चेमध्ये प्रामुख्याने अजित पवारांच्या सत्तेमध्ये झालेल्या एन्ट्रीने दुखावलेल्या आमदारांना कशा पद्धतीने शांत करावे याबाबत चर्चा झाली. त्यासोबत शिंदे गटातील अस्वस्थ आमदारांना शांत करण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार सत्तेत आल्याने शिंदे गट किंवा भाजपच्या आमदारांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे शिंदे व फडणवीस हे दोन्हीकडील आमदारांना पटवून देणार आहेत. त्यासोबत लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार व महामंडळ वाटप केले जाणार आहे. त्यामध्ये शिंदे गट त्याचबरोबर भाजप आमदारांचा समावेश केला जाईल, अशीही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

शिंदे - फडणवीस यांच्यासमोर मोठे आवाहन : अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या कारणास्तव राज्यातील महत्त्वाची खाती अजित पवार यांच्याकडे जातील अशी भीती शिंदे गटातील आमदारांसोबत भाजप गटातील आमदारांनाही आहे. या कारणाने याबाबत कशा पद्धतीने हा विषय हाताळावा व त्यांची समजूत काढावी याबाबतही चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती आहे. राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार पूर्णतः स्थिर व भक्कम परिस्थितीत असताना अजित पवारांच्या प्रवेशाने 'तीन तिघाडा काम बिघाडा' अशा पद्धतीची परिस्थिती राज्यातील सरकारची झाली आहे. अशातच सर्व आमदारांना कशा पद्धतीने शांत करता येईल, हे मोठे आवाहन शिंदे फडणवीस यांच्यासमोर आहे.

सरकार अधिक मजबूत झाले : बुधवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याबद्दल शिवसेना आमदारांमधील असंतोषाच्या अलीकडील वृत्तांना संबोधित करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की त्यांचे सरकार अधिक मजबूत झाले आहे. ते पुढे म्हणाले की पायउतार होण्याचा माझा कोणताही विचार नाही. अशा सर्व बातम्या 'अफवा' आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत शिंदे म्हणाले की, पक्षाने पक्षातल्या सर्व गोष्टींचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांनी (राष्ट्रवादीने) त्यांच्या पक्षात काय चालले आहे याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.

तीन पक्षांचे सरकार : काल मी आमच्या खासदार आणि आमदारांचीही बैठक घेतली. आमचे सरकार दिवसेंदिवस मजबूत होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले. ते पुढे म्हणाले, आमचे सरकार आता तीन पक्षांचे बनले आहे, आमच्या आमदारांची संख्या 200 पेक्षा जास्त आहे. कोणताही नेता नाराज नाही आणि सर्वांचा आमच्यावर विश्वास आहे. आमचे सरकार फक्त मजबूत होत आहे. आम्हाला पंतप्रधान मोदींचा पाठिंबा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न : तत्पूर्वी, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, राज्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये अजित पवार आणि इतर 8 राष्ट्रवादी आमदारांच्या प्रवेशामुळे येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांची बदली होऊ शकते. येत्या काही दिवसांत राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल, अशी अटकळ फेटाळून लावत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विरोधी पक्ष संभ्रम निर्माण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहेत आणि शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar NCP Meeting : बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष - शरद पवार
  2. Uday Samant On MLA Clash : शिंदे गट आमदारांमध्ये चकमक ही अफवाच, उद्याेगमंत्री सावंत यांनी राजीनाम्याचे वृत्तही फेटाळले
  3. Droupadi Murmu Shirdi Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शिर्डी दौऱ्यावर, दुसऱ्यांदा घेणार साईबाबांच्या समाधीचे दर्शन; पोलिसांचा बंदोबस्तात तैनात
Last Updated :Jul 7, 2023, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.